गाईच्या शेणापासून गणेशमूर्ती 

शेणापासून बनवलेली गणेशमूर्ती
शेणापासून बनवलेली गणेशमूर्ती

मुंबई : गाईचे शेण म्हणजेच गोमय, विषमुक्त आणि प्रदूषणमुक्त करणारे, होमहवन करण्यासाठी महत्त्वाचे असणारे, अशाच शेणापासून चक्‍क गणेशमूर्ती बनवण्याचा आगळावेगळा उपक्रम डॉ. नवनाथ दुधाळ यांनी केला आहे. खारघरमध्ये शेणापासून केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 
गोमय हे शेतकऱ्यांचे गोधन आहे. महत्त्वाचे म्हणजे पूर्वीच्या मानाने गणपतीच्या मूर्तींसाठी लागणारी माती आज दुर्मिळ झाल्याने बहुतांश मूर्तिकार प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती तयार करतात. या मूर्ती पाण्यात सहज विरघळत नाही. त्यामुळे नदी, तलाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. 
राज्यात विविध ठिकाणी गोशाळा आणि पंचगव्यचा प्रसार, प्रचार करणारे डॉ. नवनाथ दुधाळ यांच्या गुजरात येथील पंचगव्य गोशाळेत शेणापासून सुबक गणेशमूर्ती तयार केल्या जातात. तयार केलेल्या गणेशमूर्ती गणेशभक्तांसाठी विक्रीसाठी ठेवण्यात येतात. सध्या खारघरमध्ये तीन ते 10 इंचापर्यंत मूर्ती उपलब्ध आहे. या मूर्तीची जवळपास 100 ते 500 रुपये किंमत आहे. शेणापासून तयार केलेल्या गोमय गणेशमूर्तींमुळे पर्यावरणाचे रक्षण, गोधन वाचवणे तसेच शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळू शकेल. शिवाय या मूर्तींचे घरीही सहज विसर्जन करता येऊ शकते. अशा प्रकारचे अनेक फायदे होतील. या उपक्रमास पर्यावरणप्रेमी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून काही भक्तांनी गणेशमूर्तीची नोंदणीदेखील केली आहे. 
---- 
आपण शेतकऱ्यांची मुले आहोत. घरी असलेल्या गाई-गुरांवर आपले खूप प्रेम असते. शेणापासून बनवलेल्या गणेशमूर्तींमुळे कुटुंबाचे पर्यावरणाशी असलेले नाते वृद्धिंगत व्हायला मदत होते. खारघर सेक्‍टर 13 येथील अंबिका हॉटेलशेजारी संस्थेच्या पंचगव्य औषधी दुकानात गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. 
- डॉ. नवनाथ दुधाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com