नाल्यात कचरा टाकल्यास वस्त्यांचे पाणी बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

नाल्याची सफाई झाल्यानंतरही कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच असतात. कचऱ्यामुळे प्रवाहात अडथळे येऊन नाले तुंबतात. याबाबत स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने जनजागृती करावी, अशी सूचना महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

मुंबई - नाल्यात सतत कचरा टाकला जात असल्यास परिसरातील वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मंगळवारी (ता. 28) दिला. नालेसफाई, रस्तेदुरुस्ती आणि अन्य पावसाळी कामांची छायाचित्रे महापालिकेच्या ऍप्लिकेशनवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले. चुकीची माहिती दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

नाल्याची सफाई झाल्यानंतरही कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच असतात. कचऱ्यामुळे प्रवाहात अडथळे येऊन नाले तुंबतात. याबाबत स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने जनजागृती करावी, अशी सूचना महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. नाल्याच्या कडेला जाळ्या आणि तरंगते झाडू (फ्लोटिंग ब्रूम) बसवावेत. नाल्यात कचरा टाकला जात असल्यास सुरवातीला दंडात्मक कारवाई करावी.

त्यानंतरही असे प्रकार न थांबल्यास नाल्याच्या परिसरातील पाण्याच्या जोडण्या कापाव्यात, असा स्पष्ट आदेश महापालिका आयुक्तांनी दिला.
महापालिकेने यापूर्वीही दंडात्मक कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, नाल्यांत कचरा कोण टाकतो, हे समजत नसल्यामुळे कारवाई कशी करावी, असा पेच महापालिकेसमोर होता. महापालिका आयुक्तांच्या या निर्णयामुळे आता स्थानिक रहिवाशांना नाल्यात कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला रोखावे लागेल; अन्यथा त्यांचा पाणीपुरवठा बंद होऊ शकतो.

महापालिका आयुक्त परदेशी यांनी मंगळवारी विभागप्रमुखांची मासिक आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रामुख्याने पावसाळी कामांचा आढावा घेण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage in Gutter Water Supply Close Municipal