कचरामाफियांना टिपणार आठ मोबाईल हायमास्ट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर रात्रीही नजर

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर रात्रीही नजर
मुंबई - देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील (क्षेपणभूमी) माफियांवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेने प्रखर झोताचे आठ हायमास्ट दिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे. हे मोबाईल हायमास्ट असल्याने गरजेनुसार ते कोणत्याही दिशेला फिरू शकतात. पालिका वर्षभरासाठी हे दिवे भाड्याने घेणार असून, त्यासाठी 94 लाख 26 हजारांचा खर्च करणार आहे.

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर काही वर्षांपूर्वी माफियांनी कचरा पेटवला होता. ही आग काही दिवस धुमसत होती. त्यामुळे मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली होती. त्यानंतर पालिकेने डम्पिंग ग्राऊंडभोवती संरक्षक भिंत उभारण्यास सुरुवात केली. आता त्याचा पुढचा टप्पा म्हणून प्रखर झोताचे दिवे लावण्यात येणार आहेत. या दिव्यांमुळे माफियांच्या वावरावर आळा घालणे शक्‍य होईल. पुरेश्‍या प्रकाशामुळे रात्री कचरा ओतणेही शक्‍य होईल. हे दिवे सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. यासाठी 94 लाख 26 हजारांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे.

दोन जेसीबी, तीन डम्पर
डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा समान पातळीवर ठेवण्यासाठी आणि आग लागल्यावर कचरा अन्यत्र हलवण्यासाठी दोन जेसीबी यंत्रे आणि तीन डम्पर महापालिका भाड्याने घेणार आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी 74 लाखांचा खर्च होईल.

Web Title: garbage mafia, 8 mobile himast