कचरा फक्त कल्याण पश्‍चिमेतच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

कल्याण  - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचऱ्यावरील प्रक्रिया करणारे प्रकल्प कल्याण पश्‍चिम परिसरातच सुरू होत असल्यामुळे स्थानिक आमदार नरेंद्र पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिका क्षेत्रात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एकूण 13 बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे निश्‍चित करण्यात आले होते; मात्र अनेक अडचणींमुळे यातील आठ प्रकल्प गुंडाळण्याचा विचार पालिका प्रशासन करत असल्याचे समजते. या पार्श्‍वभूमीवर उंबर्डे, बारावे प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याने पालिका क्षेत्रातील कचरा फक्त कल्याण पश्‍चिम परिसरातच येण्याची भीती आहे. 

घनकचरा व्यवस्थापनासाठी कल्याण-डोंबिवली पालिका 13 विविध ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारत आहे; मात्र या प्रकल्पांसाठी आवश्‍यक तशा पद्धतीने कचऱ्याची वर्गवारी करण्यात पालिका प्रशासन असमर्थ ठरले असल्याने हे प्रकल्प गुंडाळण्याचा विचार पालिका प्रशासन करत असल्याचे समजते. रोज तयार होणाऱ्या 800 टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने हे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत; मात्र यासाठी ज्या तंत्राचा वापर आवश्‍यक आहे, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात प्रशासनास अपेक्षित यश मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा जमा करणे आवश्‍यक आहे. जमा केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करणे जिकीरीचे आहे. वर्गीकरण करून कचरा देण्यास नागरिकांनी सहकार्य न दिल्याने प्रकल्पांना आवश्‍यक त्या प्रमाणात कचरा पुरवणे पालिकेला अशक्‍य झाले आहे. उंबर्डे आणि बारावे येथील प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याने तेथे कामाची सुरुवात झाली आहे. हे प्रकल्प या वर्षात अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अत्यंत घिसाडघाईत आयरे येथील प्रकल्प सुरू करण्यात आला; मात्र या प्रकल्पाला आवश्‍यक तेवढ्या प्रमाणात कचरा पुरवणे पालिकेला अशक्‍य होत असल्याचे आता स्पष्ट होत आहे. हा प्रकल्पही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. 

प्रकल्पांना अपेक्षित यश नसल्याने अडचणी 
राष्ट्रीय हरित लवादासमोर सुरू असलेल्या सुनावणीतही पालिकेने अनेक आश्‍वासने दिली आहेत. प्रत्यक्षात त्या दिशेने वाटचाल होत नसल्याने कारवाईचा बडगा उगारला जाण्याची भीतीही व्यक्त होत आहे. स्थानिकांकडून विरोध होत असतानाही सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पांना अपेक्षित यश मिळत नसल्याने प्रशासन अडचणीत आले आहे. त्यातूनच उर्वरित प्रकल्प गुंडाळण्याच्या निर्णयापर्यंत प्रशासन पोहोचले आहे. अनेक वर्षांपासून आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकला जात आहे. नवीन प्रकल्पही आता पश्‍चिम परिसरातच सुरू होत आहेत. 

प्रस्तावित प्रकल्पांना गती देण्यात पालिका प्रशासनाला अपयश येत आहे. त्यातच आता फक्त पश्‍चिमेतील प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. या पुढे किती काळ पालिका क्षेत्रातील कचरा आमच्या भागात टाकला जाणार हा खरा प्रश्‍न आहे. 
- नरेंद्र पवार, आमदार, कल्याण पश्‍चिम 

मार्च 2019 पर्यंत उंबर्डे आणि बारावे येथील प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होतील. इतर आठ प्रकल्पांची प्रक्रिया सुरू आहे. या वर्षाअखेरीस ते काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. 
- धनाजी तोरसकर, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन 

Web Title: garbage is only in Kalyan West