उड्डाणपुलाखाली राडारोडा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

बेलापूर - बेलापूर रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे लाईनवरील उड्डाणपुलाखाली कचरागाड्या, गॅरेज, निकामी पेव्हरब्लॉक, दुभाजकाचे फुटलेले दगड, भंगार कचराकुंड्या पडल्या आहेत. रात्री येथे मद्यपी पार्ट्या करतात. विशेष म्हणजे त्यांच्यावर कारवाई करण्याकडे महापालिका दुर्लक्ष करते. त्यामुळे याचा त्रास शेजारच्या कार्यालयांतील कामगार आणि शहाबाजमधील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.

नवी मुंबईतील शांत नोड म्हणून बेलापूर नोडची ओळख आहे; परंतु या नोडमध्ये नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी बेलापूर येथे सिडकोने उड्डाणपूल बांधला आहे. या उड्डाणपुलाखाली कचरा वाहून नेणारी वाहने मोठ्या प्रमाणावर उभी केली जातात. कंत्राटदाराने येथे गॅरेज सुरू केले आहे. बेलापूर विभागातील जुन्या भंगार कचराकुंड्यांचा येथे ढीग लागला आहे. बेलापूर विभागात रस्त्यांची आणि पदपथांची कामे झाल्यावर निकामी झालेले पेव्हरब्लॉक आणि रस्ता दुभाजकाचे निकामी दगड व सिमेंटचे ब्लॉक येथे टाकले जातात. रात्री येथे मद्यपींच्या पार्ट्या सुरू असतात. या सर्व प्रकारामुळे या परिसराला बकाल रूप आले आहे. कचरा उचलणारी वाहने या पुलाखाली उभी असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. उड्डणपुलाच्या शेजारी सीबीडी, सेक्‍टर ११ मध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. तेथील कामगार आणि शहाबाज गावातील नागरिकांना याचा त्रास होतो. त्यामुळे यावर महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

उड्डाणपुलाखालील जागेचा पालिकेकडूनच गैरवापर होत आहे. या ठिकाणी रात्री मद्यपी पार्ट्या करीत असतात. शहाबाज गावातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- भाऊसाहेब आव्हाड, रहिवासी, बेलापूर 

कचरा गोळा करणारी वाहने आणि उड्डाणपुलाखालील जागा पालिकेची मालमत्ता आहे. या ठिकाणच्या समस्यांबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. तशी कुणी तक्रार केली, तर कार्यवाही केली जाईल. 
- दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, परिमंडळ एक

Web Title: garbage under flyover