दिव्यांग पर्यावरणप्रेमींनी फुलवले उद्यान 

सकाळ वृत्‍तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

खारघरमधील अोवे तलावाभोवती बहरली रंगबेरंगी फुले

खारघर : प्रदूषणाची सीमा दिवसेंदिवस वाढत असताना दिव्यांग मुलांनी एकत्र येत खारघरमधील ओवा तलावाकाठी विविध फुलझाडांची वर्षभरापूर्वी लागवड केली होती. वृक्षसंवर्धनासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीला आज यश आले असून तलावाभोवती विविध रंगबेरंगी फुले बहरली आहेत. परिसरात जास्वंद, चाफ्याच्या झाडांना फुले लागली असून दिव्यांग पर्यावरणप्रेमींनी फुलवलेल्या उद्यानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

खारघर, सेक्‍टर ३५ मध्ये तळोजा मध्यवर्ती कारागृहासमोर डोंगराच्या पायथ्याशी ओवा तलाव आहे. तलावात बाराही महिने पाणी असल्यामुळे काही वाहनचालक तलावातील पाण्याचा उपयोग वाहने धुण्यासाठी करतात; तर काही दुचाकी आणि रिक्षाचालक थेट तलावातच गाड्यांचे पाणी सोडत असल्याने जलप्रदूषण होत आहे. याबाबात पर्यावरणप्रेमींनी अनेकदा खंत व्यक्‍त केली. नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र काही नागरिकांची वृत्ती बदलण्यात त्यांना फारसे यश आले नाही. अखेर पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत तलावाशेजारील डोंगरावर झाडे लावून तलावातील पाणी झाडांना देण्याचा संकल्प केला.

पहिल्या वर्षी काही झाडे लावून जागविल्याने हळूहळू या पर्यावरणप्रेमींच्या संख्येतही वाढ होत गेली. ज्योती नाडकर्णी, सुधीर पटेल, धर्मेंद्र कर यांच्यासह काही पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत चार हजारांहून अधिक झाडे लावली. या वर्षी मे आणि जून महिन्यात पर्यावरणप्रेमींसाठी रोपलागवड राबविली. या मोहिमेत शेकडो जण सहभागी झाले. यामध्ये दिव्यांग मुलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत तलावाच्या सभोवती जास्वंद, चाफा अशा अनेक फुलझाडांची लागवड केली.  

कारवाईची गरज 
तलावात काही जण पहाटेच्या वेळी मच्छीमारी करून तलावात प्रदूषण निर्माण करीत असल्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. सिडको आणि पनवेल पालिका प्रशासनाने मच्छीमारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. खारघरमधील काही मंदिरात देवीदेवतांना वाहिलेली फुले, हार आदी धार्मिक वस्तू काही भक्त एकत्र करून तलावात टाकतात. त्यामुळे तलाव प्रदूषित होत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी तलावाशेजारी निर्माल्य कलश उपलब्ध केला असून घरातील निर्माल्य कलशात टाकण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The garden is blown up by the avid environmentalists