खवय्यांच्या मेजवानीत गावरान कोंबडी

सकाळ वृत्‍तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

गटारीला पाचशे रुपये दराने ६ टन विक्री

मुंबई : आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून बुधवारी पनवेलमध्ये चिकन, मटणाच्या दुकानात मोठी गर्दी पाहायला मिळाली. गटारीच्या दिवशी खवय्यांच्या मेजवानीत गावरान कोंबडीला विशेष पसंती मिळाली. ग्राहकांनी गावरान कोंबडी खरेदीला पसंती दर्शविली असून ४५० ते ५०० रुपये दराने जवळपास ६ टन गावरान कोंबडीची विक्री तालुक्‍यातील बाजारात झाली असल्याची माहिती कोंबडी विक्रेत्यांकडून मिळाली.

पनवेल परिसरात अनेकांनी रविवारपासूनच मटण, चिकनवर ताव मारण्यास सुरुवात केली. बाजारपेठेत २२ ते २५ टन चिकनची आवक झाल्याची माहिती होलसेल चिकनचे विक्रेते योगेश महाजन यांनी दिली असून गावरान कोंबडीला जास्त मागणी असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

दुप्पट आवक
तालुक्‍यात दररोज जवळपास १० टन कोंबड्यांची आवक होत असते; मात्र बुधवारी गटारी अमावास्याकरिता जवळपास दुप्पट म्हणजे २२ ते २५ टन कोंबड्यांची आवक पनवेलमध्ये झाली होती.

मटण खरेदीला मागणी 
५२० रुपये किलो दराने विक्री करण्यात येत असलेल्या मटणाला बुधवारी चांगली मागणी होती; मात्र आवक कमी असल्‍याने दुकानदारांना लवकरच दुकान बंद करावे लागले. दररोज साधारणतः १ ते २ बोकड विक्री करणाऱ्यांनी आज जवळपास ५ ते ६ बोकडांची विक्री केली. कळंबोलीमधील प्रसिद्ध असलेल्या पापा पटेल या मटणविक्रेत्याकडे दिवसभरात दररोज २० ते २५ बकरे कापले जातात. बुधवारी ४० ते ५० बकऱ्यांच्या मटणाची विक्री करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

चिकनचे दर स्थिर; गावरानला चढा भाव 
जिवंत बॉयलर कोंबडी घेतल्यास १२५ रुपये किलो दराने विक्री केली जात होती; तर चिकनची विक्री २०० रुपये किलोप्रमाणे करण्यात येत होती. गावरान कोंबडीने मात्र मटणालाही मागे टाकत चांगलाच दर मिळविला. बुधवारी ३०० रुपयांनी मिळणारी गावरान कोंबडी ४०० ते ५०० रुपये किलो दराने विकली जात होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gavran chickens at a banquet feast