‘गीतरामायण’ आता हिंदीत 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

हिंदी गीतरामायण प्रकाशन समितीच्या वतीने सुनील देशपांडे यांनी केलेल्या ‘संगीत रामायण’ या भावानुवादाचा लोकार्पण सोहळा २५ ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजता दादर येथील प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृहात होईल.

मुंबई ः शब्दप्रभू ‘गदिमा’ (ग. दि. माडगूळकर) आणि ज्येष्ठ संगीतकार ‘बाबूजी’ (सुधीर फडके) यांच्या प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायण’ या मराठी महाकाव्याचे देश-परदेशांत अनेक कार्यक्रम झाले. रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेले ‘गीत रामायण’ आता हिंदीत येणार आहे. 

हिंदी गीतरामायण प्रकाशन समितीच्या वतीने सुनील देशपांडे यांनी केलेल्या ‘संगीत रामायण’ या भावानुवादाचा लोकार्पण सोहळा २५ ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजता दादर येथील प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृहात होईल. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. लखनऊ विश्‍वविद्यालयाचे माजी हिंदी विभागप्रमुख आचार्य सूर्यप्रकाश दीक्षित, आनंद माडगूळकर, हिंदी साहित्य अकादमीच्या अध्यक्ष शीतला दुबे, ज्येष्ठ पत्रकार सुंदरचंद ठाकूर आदी मान्यवरांचीही उपस्थिती असेल. या सोहळ्यानंतर प्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर यांच्या संगीत संयोजनात ‘संगीत रामायण’ या भावानुवादातील निवडक गाणी सादर केली जातील.

रसिकांना अभिमान वाटावा, अशा मराठी भाषेतील वाङ्‌मयीन व सांगितिक निवडक कलाकृतींमध्ये ‘गीत रामायण’ अग्रस्थानी आहे. या गीतांचा सुश्राव्य आनंद हिंदी भाषेतही अनुभवायला मिळावा, या उद्देशाने ‘संगीत रामायण’ संकल्पना साकारली आहे. 
- सुनील देशपांडे, अनुवादक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: geet ramayan will be in hindi also