जेनेरिक औषधांची दुकाने कमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

मागणी वाढली; राज्यात अधिकृत 81, मुंबई परिसरात सात दुकाने

मागणी वाढली; राज्यात अधिकृत 81, मुंबई परिसरात सात दुकाने
मुंबई - केंद्र सरकारने ब्रॅंडेड औषधांच्या तोडीस तोड असलेल्या मात्र अत्यल्प किमतीत मिळणाऱ्या जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्याची योजना राबवली आहे. जेनेरिक अर्थात जनौषधींच्या ब्रॅंडिंगमुळे या औषधांची मागणीही वाढली आहे. दोन महिन्यांत या दुकानांतील जेनेरिक औषधांचा खप दुपटीने वाढला आहे; मात्र ही दुकाने खूपच कमी आहेत. मुंबई परिसरात अवघी सात दुकाने आहेत.

जेनेरिक औषधे विकणाऱ्या दुकानांबाहेर "प्रधानमंत्री भारतीय जनऔषध केंद्र' हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी असलेले मोठमोठे फलक झळकू लागले आहेत. जेनेरिक औषधांबाबत लोकांमध्ये जागृती होत असली, तरी देशात केवळ एक हजार 191 अधिकृत जनऔषधी विक्री केंद्रे आहेत. यातील सर्वाधिक 181 केरळमध्ये असून, सर्वांत कमी तीन केंद्रे मिझोराममध्ये आहेत. 11 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात अधिकृत केवळ 81 जेनेरिक दुकाने आहेत.

जेनेरिक औषधांच्या वापराचा आग्रह खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आज सरकारी रुग्णालये, नर्सिंग होम येथे जेनेरिक औषध विक्री केंद्रे नाहीत. खासगी औषध विक्री दुकानांमध्येही जेनेरिक औषधे उपलब्ध नाहीत. लोकसंख्येच्या प्रमाणात जेनेरिक औषधे कमी पडत असल्याने, तसेच विक्री केंद्रे दूर असल्याने रुग्णही ब्रॅंडेड कंपन्यांचीच औषधे घेत आहेत.

कर्करोग, एचआयव्हीवरील औषधांचा अभाव
सध्या कर्करुग्णांच्या केमोथेरेपीच्या वेळी वापरली जाणारी थोडीफार औषधेच जेनेरिक आहेत. त्याशिवाय "एचआयव्ही' रुग्णांना लागणारी औषधेही जेनेरिकच्या दुकानात मिळत नाहीत.

जेनेरिक औषधांची विभागवार केंद्रे
औरंगाबाद - 27
पुणे - 18
नागपूर - 13
नाशिक - 12
मुंबई परिसर - 7 (ठाणे, घाटकोपर, बोरिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मालाड, नालासोपारा - 1 प्रगतिपथावर)
कोकण - 4
एकूण - 81

विक्रेते, कंपन्या, डॉक्‍टर व फार्मासिस्ट यांच्यासाठी कडक कायदे करून अंमलबजावणी करायला हवी. डॉक्‍टरांनी जेनेरिक औषधे लिहून दिलीच पाहिजेत. त्याला अजिबात विरोध नाही; परंतु जेनेरिक औषधे विक्री केंद्रात मुबलक प्रमाणात नाहीत. केंद्रांची संख्या खूपच कमी आहे. अनेकदा जेनेरिक दुकानांमध्ये काही औषधे स्वस्तात मिळत नाहीत.
- डॉ. अनिल लद्दड, सदस्य, महाराष्ट्र वैद्यक परिषद

ठाण्यातील लोकमान्यनगरात 6 ते 8 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या जेनेरिक औषधांच्या दुकानाची परिस्थिती बिकट होती. दिवसाला 3 ते 4 ग्राहकच येत असल्यामुळे दुकान चालवणे कठीण झाले होते. हे दुकान झोपडपट्टी भागात असल्याने जेनेरिक औषधांबाबत ग्राहक अज्ञान होते; मात्र पंतप्रधानांच्या नावाचे फलक दुकानाबाहेर लागल्यानंतर चित्र पालटले. दोन-तीन दिवसांपासून ग्राहकांची संख्या 30 ते 35 पर्यंत पोचली आहे. सुरवातीला महिन्याला जेमतेम 10 हजारांपर्यंत मर्यादित असलेले उत्पन्न या महिन्यात 40 ते 50 हजारांपर्यंत पोचले आहे. इथल्या बहुतांश औषधांचे उत्पादन इंदूरमध्ये होते. त्यानंतर नागपूरमार्गे ही औषधे आपल्या राज्यात येतात.
- भाग्यश्री ढेरे, फार्मासिस्ट

Web Title: generic medicine medical less