मुंबई : जर्मन भाषेचा प्रस्ताव विचाराधीन!

शालेय शिक्षणाबाबत वर्षा गायकवाड यांचे मत; विद्यार्थ्यांशी संवाद
German language proposal under consideration Varsha Gaikwad school education
German language proposal under consideration Varsha Gaikwad school educationsakal

मुंबई : शिक्षणाच्या क्षेत्रात असलेली आव्हाने लक्षात घेऊन, त्यासाठी जर्मन भाषेचा आणि तेथील तंत्रज्ञानाचा वापर शालेय शिक्षणात होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणात जर्मन भाषा शिकवण्यासाठी नक्कीच विचार केला जाईल, असे मत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सकाळ माध्यम समूह, जर्मन दूतावास व म्युनिचचे महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित ‘ग्लोबल महाराष्ट्र’ या मार्गदर्शनपर कार्यशाळेत व्यक्त केले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील एक हजारांहून अधिक शाळांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ग्लोबल महाराष्ट्र’ उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गायकवाड बोलत होत्या. त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच, जर्मनीतील वाणिज्य दूतावासात कार्यरत असलेले मराठी अधिकारी डॉ. सुयश चव्हाण यांनी कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जर्मन भाषा शालेय स्तरावरील शिक्षणातच शिकवली जावी, असा प्रस्ताव डॉ. चव्हाण यांनी मांडला. त्यावर मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, जर्मन ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे; पण इंग्रजीही महत्त्वाची असल्याने आपण ती पहिलीपासून सुरू करत आहोत. त्याच पार्श्वभूमीवर येत्या काळात आंतरराष्ट्रीय भाषा शालेय शिक्षणात शिकवता येईल. तसेच, जर्मन दूतावासाने आम्हाला वेळोवेळी प्रशिक्षण, अभ्यास पद्धती, व्यवसाय शिक्षण आदी विषयांसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या वेळी ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळ माध्यम समूहअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. त्यामध्ये ‘सकाळ इंडिया फाऊंडेशन’कडून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, तसेच  शालेय गरजू विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक पालकत्व योजना आदी उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्र मंडळ म्युनिचतर्फे केदार जाधव यांनी जर्मन भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. जर्मनीत कायम कुशल मनुष्यबळाची गरज असून याचा उपयोग आपल्या मुलांनी घ्यावा जर्मनीत शिक्षण मोफत असून शिक्षण घेताना काम करून पैसे कमवण्याची  संधी आहे. याशिवाय जर्मन भाषा व मराठी भाषेत खूप साम्य असून, जर्मन भाषा शिकण्यास सोपी आहे असेही सांगितले. जर्मनीतील मराठी तरुणाशी ‘संवाद’ अंतर्गत शुभम आव्हाड व विजया नाईक यांनी महाराष्ट्र ते जर्मनी असा प्रवास व तेथील अनुभव याबाबत माहिती दिली. 

आपले मार्गदर्शक उपक्रमअंतर्गत जर्मनी येथील उद्योजक प्रसाद चौधरी व अद्वैत खरे यांनी जर्मनीतील शिक्षण पद्धती, तेथील सुविधा आपल्या मुलांसाठी जर्मनीतील विविध कारकिर्दीची संधी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. दरवर्षी इतर देशातून जर्मनीत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. दरवर्षी १७ हजारांहून अधिक विद्यार्थी जर्मनीत शिक्षणासाठी येत आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर विविध शाळेतील शिक्षक व मुलांच्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी उत्तरे दिली. डॉ. चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानत समारोप केला.

शिक्षणमंत्र्यांकडून उपक्रमाचे कौतुक

आपले सगळेच विद्यार्थी देशाचे भवितव्य आणि संपत्ती आहेत. आज जागतिकीकरणामुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुले परदेशात शिकायला जातात. शालेय जीवनापासून त्यांना ‘सकाळ माध्यम समूह’ आणि जर्मन दूतावासाच्या प्रयोगामुळे मार्गदर्शन मिळाले तर ते भविष्यात मोठी भरारी घेऊ शकतील, अशा शब्दांत शिक्षणमंत्र्यांनी सकाळ माध्यम समूह, जर्मन दूतावास आणि महाराष्ट्र मंडळ (म्युनिच)ने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले.

आपल्याकडे विद्यार्थ्यांना जपानी व इतर भाषा येते तसे जर्मनही बोलता यायला हवे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना त्या भाषेमुळे मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकेल. विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच मातृभाषेप्रमाणेच इतर भाषेचे शिक्षण घेतले तर त्याचाही फायदा होऊ शकेल. त्याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणात जर्मन भाषा शिकवण्यासाठीच्या प्रस्तावाचा नक्कीच विचार करू.

- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com