नवी मुबईकरांनो... खुशखबर; पालिका- सिडकोत झालाय 'हा' समझौता

सुजित गायकवाड
गुरुवार, 16 जानेवारी 2020

घणसोली व ऐरोली नोड एकमेकांना जोडण्यासाठी कांदळवनांवर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या उभारणीच्या कामात सिडकोतर्फे ५० टक्के खर्च केला जाणार आहे. याबाबत महापालिकेच्या लेखी देण्याच्या विनंतीला सिडकोने हिरवा कंदील दर्शवला आहे.

नवी मुंबई : घणसोली व ऐरोली नोड एकमेकांना जोडण्यासाठी कांदळवनांवर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या उभारणीच्या कामात सिडकोतर्फे ५० टक्के खर्च केला जाणार आहे. याबाबत महापालिकेच्या लेखी देण्याच्या विनंतीला सिडकोने हिरवा कंदील दर्शवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पालिका आयुक्त मिसाळ यांनी लेखी देण्याची मागणी सिडकोकडे केली होती. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ही बातमी वाचली का? मुंबई ते ठाणे प्रवास अधिक वेगवान!

नवी मुंबई महापालिकेची स्थापना होऊन तब्बल २५ वर्षे उलटली तरी सिडकोने घणसोली नोडला महापालिकेच्या स्वाधीन केले नव्हते. त्यामुळे महापालिकेत येणाऱ्या इतर नोडपैकी घणसोली नोडचा विकास खुंटला होता. घणसोली नोडच्या गतिमान विकासासाठी महापालिकेत आलेल्या सर्वच आयुक्तांनी प्रयत्न केले. त्यापैकी एक असणाऱ्या ऐरोलीला घणसोलीशी जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाला वेग देण्याचा प्रयत्न विद्यमान आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सुरू केला आहे. घणसोलीपासून ऐरोलीदरम्यानच्या सुमारे दोन किलोमीटरच्या परिसरात एक लहान खाडी व काही कांदळवनांचा भाग असल्यामुळे सिडकोने तयार केलेला रस्ता ऐरोलीला जोडण्यापासून रखडला आहे. यादरम्यान उड्डाणपूल तयार केल्यास घणसोली ऐरोली भागाला जोडली जाऊन अंतर्गत वाहतुकीच्या खोळंब्याचा प्रश्‍न कायमचा सुटणार आहे.

ही बातमी वाचली का? वेशीवर घडतंय असं काही...; नवी मुंबईकर झालेत त्रस्त!

३०० कोटींचा खर्च अपेक्षित
कांदळवने व खाडी भाग असल्यामुळे पालिकेतर्फे त्यावर उन्नत उड्डाणपूल तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्याकरिता अंदाजे ३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या उड्डाणपुलाच्या परिसरात सिडकोच्या मालकीचे सर्वाधिक भूखंड असल्याने भूखंड विक्रीतून सिडकोला कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे उड्डाणपूल उभारणीतील ५० टक्के खर्चाचा भार उचलावा, अशी मागणी महापालिकेने सिडकोकडे केली होती. महापालिकेने केलेल्या मागणीला सिडकोनेही तत्त्वतः मंजुरी दर्शवली आहे, परंतु त्यापुढे कार्यवाही होत नसल्याने हा प्रकल्प गेली तीन वर्षे खितपत पडून राहिला आहे.

घणसोली व ऐरोलीला जोडणाऱ्या कांदळवनांवरील पुलाच्या उभारणीकरिता सिडकोतर्फे अर्थसाह्य केले जाणार असल्याचे याआधीच व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले आहे. परंतु लेखी आश्‍वासनाबाबत पालिकेच्या मागणीनुसार लेखी देण्यात येईल.
- अशोक शिनगारे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghansoli-Aeroli flyover soon cidco green signal