घाटकोपर स्थानकातील गर्दी फुटणार!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

गर्दीवर नियोजनासाठी मेट्रो स्थानकात अनेक बदल करण्यात आले आहेत.

मुंबई : घाटकोपर रेल्वे स्थानकातील कोंडी सोमवारपासून कमी होणार आहे. यासाठी मेट्रो स्थानकात तसेच रेल्वे स्थानकात काही बदल करण्यात आले आहेत. तसेच काही बदल महिनाभरात पूर्ण होणार आहेत. पहिल्या टप्प्यात मेट्रो स्थानकातील रेल्वेचे तिकीट घर आणि मेट्रो स्टेशन मास्तरांच्या कार्यालयासह काही दुकानेही हलवण्यात आली आहेत. 

सकाळच्या वेळेस घाटकोपर मेट्रो स्थानकावरील रांगा रेल्वेच्या पुलापर्यंत येत असल्याने मोठी कोंडी होत होती. "सकाळ'ने या विषयाला वाचा फोडत याबाबतचे वृत्त दिले होते. तसेच रेल्वे प्रवाशांकडूनही वेळोवेळी याविरुद्ध आवाज उठवला जात होता. त्यानुसार ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी गर्दीवर तोडगा काढण्याची मागणी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली.

त्यानुसार गोयल यांनी यावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश रेल्वे आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार हे नियोजन करण्यात आले आहे. यातील काही बदल तत्काळ करण्यात आले असून काही बदलांसाठी 30 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

प्रवाशांना घाटकोपर मेट्रो स्टेशनवर जास्त जागा उपलब्ध होणार असून रांगेचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येईल. या बदलांची सवय व्हायला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे या काळात प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई मेट्रो वनच्या प्रवक्‍त्यांनी केले आहे. 

महिनाभरात हे होणार 

मध्य रेल्वेचे तिकीटघर हलवून स्कायवॉकजवळ उभारण्यात येईल. तसेच मेट्रो स्थानकात नव्या तिकीट कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले असून या महिनाअखेर हे काम पूर्ण होईल. मेट्रो स्थानकातील सुरक्षा तपासणी केंद्र मेट्रो स्टेशनच्या आत घेण्यात येईल. तसेच ऑटोमॅटिक फेअर कलेक्‍शन्स गेटची जागा 50 मीटरने पुढे ढकलण्यात आली असून सुरक्षा तपासणी आणि सामान तपासणी यंत्रांची संख्या सातवरून 11 करण्यात येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ghatkopar railway station rush will decrease