तिने उचलले धाडसी पाऊल; साखरपुडा झालेल्या वधूचे पोलिसांविरोधात उपोषण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

साखरपुडा झाल्यावर वर पक्षाने हुंड्याची मागणी करून लग्न मोडल्याने वधूपक्षाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर कारवाई करण्या ऐवजी वधूच्या नातेवाईकांना दमदाटी

किन्हवली :  साखरपुडा झाल्यावर वर पक्षाने हुंड्याची मागणी करून लग्न मोडल्याने वधूपक्षाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर कारवाई करण्या ऐवजी वधूच्या नातेवाईकांना दमदाटी करणाऱ्या पोलिसांविरोधात वधू कविता दामोदर फर्डे हिने आज (दि.11) सकाळी 11:30 पासून किन्हवली पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

शहापूर तालुक्याच्या किन्हवली परीसरातील चेरवली येथील कविता दामोदर फर्डे या एम ए डी एड शिक्षण झालेल्या युवतीचे (मुळगाव रा. नागाव, ता. मुरबाड) सध्या बोळींज ता.वसई, जिल्हा पालघर येथे स्थायिक असलेल्या प्रवीण बाळकृष्ण हरड याच्याशी थाटामाटात साखरपुडा झाला.  दि.31मार्च 2019 हि विवाह तारीख ठरल्याने वधू पक्षाने सोने, कपडे, मंडप, वाजंत्री, नवरदेवासाठी घोडा असे सर्व निश्चित केले होते. दरम्यान वराचे वडील बाळकृष्ण व आई निरा यांनी कविताच्या नातेवाईकांना घरी बोलावून चार लाख रुपये हुंडा व विवाहस्थळी येण्यासाठी तीन बस द्या तरच हे लग्न होईल असा दम दिला. ईतका खर्च करण्याची ऐपत नसल्याने वधू पिता दामोदर याने गयावया करूनही हरड कुटुंबीयांनी हे लग्न मोडले. शिवाय कविताचे कुठेच लग्न जमू देणार नाही असा नवरदेवाने दम दिला.

या प्रकाराने भेदरलेल्या वधू कविता हिने वर प्रवीण व आपला मुलगा शिक्षक असल्याचे खोटे सांगणाऱ्या त्याच्या आई वडिलांविरोधात किन्हवली पोलिस ठाण्यात तक्रार केली. पण गुन्हेगारावर कारवाई करण्याऐवजी सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण फेगडे व त्यांचा लिपिक सहकारी विलास आगीवले हे फर्डे कुटुंबियांवर कारवाई करण्याची धमकी देत असल्याने वधू कविता हि आजपासून (दि.11) किन्हवली पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषणास बसली आहे.

Web Title: A girl fight against a dowry