बंद घरातील स्फोटात मुलगी होरपळली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

दादर पश्‍चिमेतील भवानी शंकर रोडनजीकच्या पोलिस वसाहतीच्या (सैतान चौकी) तिसऱ्या मजल्यावरील कुलूपबंद घरात रविवारी (ता. १२) दुपारी २ च्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला.

मुंबई - दादर पश्‍चिमेतील भवानी शंकर रोडनजीकच्या पोलिस वसाहतीच्या (सैतान चौकी) तिसऱ्या मजल्यावरील कुलूपबंद घरात रविवारी (ता. १२) दुपारी २ च्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत घरातील श्रावणी चव्हाण (वय १४) हिचा होरपळून मृत्यू झाला. घराला कुलूप लावून तिचे आई-वडील लग्नसोहळ्याला गेले होते. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सिलिंडरच्या स्फोटामुळे मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आग वाढली होती. स्फोटाचा आवाज ज्या घरातून आला, त्या घराला कुलूप होते. त्यामुळे कोणालाही घरात प्रवेश करता येत नव्हता. आग वाढत गेल्याने आगीची झळ शेजारील तीन घरांना पोहचली.  आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पाण्याचा मारा केला. अग्निशमन दलाचे जवानही तत्काळ दुर्घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग आटोक्‍यात आणली. आगीत गंभीररित्या भाजलेल्या श्रावणीला परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तिचे आई-वडील लग्नसोहळ्यासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे श्रावणी घरात एकटीच होती आणि घराच्या दरवाजाला कुलूप लावलेले होते. कुलूप तोडून अग्निशमन दलाचे जवान घरात घुसले त्या वेळी श्रावणी आगीत होरपळलेली दिसली. दरम्यान, आग लागलेल्या घरात शिरताच तिथे रॉकेलचा वास येत होता, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी एस. बी. कराडे यांनी दिली. आगीचा अहवाल तीन दिवसांत मिळेल, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl gurnt in cylinder explosion,