ठाण्यात भरदिवसा तरुणीचा खून 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

ठाणे : प्रेम प्रकरणातून तरुणाने धारदार शस्त्राने महाविद्यालयीन युवतीवर वार करून खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गावर हाजुरीनजीक घडली. प्राची विकास झाडे (20, रा. कोपरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोर आकाश पवार (23, रा.काल्हेर) याला ठाणे पोलिसांनी काही तासांतच अटक केली. 

ठाणे : प्रेम प्रकरणातून तरुणाने धारदार शस्त्राने महाविद्यालयीन युवतीवर वार करून खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गावर हाजुरीनजीक घडली. प्राची विकास झाडे (20, रा. कोपरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोर आकाश पवार (23, रा.काल्हेर) याला ठाणे पोलिसांनी काही तासांतच अटक केली. 

कोपरी-किशोरनगर येथील आनंद भवनशेजारी पालकांसमवेत राहणारी प्राची ही एन. जी. बेडेकर वाणिज्य महाविद्यालयात शिकत होती. शनिवारी सकाळी ती घोडबंदर रोडच्या दिशेने दुचाकीवरून जात होती. यावेळी दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या आकाशने महामार्गावर आरटीओ कार्यालयासमोर दुचाकी अडवून तिला खाली पाडले आणि तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. हल्ला केल्यानंतर आकाशने त्याची दुचाकी घटनास्थळीच टाकून खासगी बसखाली आत्महत्येचा प्रयत्न केला. इतक्‍यात पाठीमागून आलेल्या त्याच्या सहकाऱ्याने आकाशला आपल्या दुचाकीवर बसवून दोघेही घटनास्थळावरून पसार झाले.

मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने आकाशला काल्हेरमधून अटक केली. यावेळीही त्याने गाडीखाली आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, प्राची ही महामार्गावरच रक्ताच्या थारोळ्यात पडली असतानाही तिला कोणत्याही वाहनचालकाने मदत केली नाही. अखेर बघ्यापैकी काही जणांनी तिला टेम्पोमधून खासगी रुग्णालयात नेले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

प्रेमातील असूया कारणीभूत? 

प्राची आणि आकाश यांची महाविद्यालयात असताना ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत होऊन आकाश तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला होता. तो नेहमी तिचा आणि तिच्या मैत्रिणींचा पाठलाग करत असे. त्याच्या या त्रासाला कंटाळून दीड महिन्यापूर्वी प्राची व तिच्या मैत्रिणींनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याचा आरोप प्राचीच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दुसऱ्या युवकाच्या दुचाकीवर बसल्याने आकाशमध्ये असूया निर्माण झाली होती. त्यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. 

पूर्ववैमनस्याची शक्‍यता नाकारली 

ठाणे स्थानक परिसरातील व्यावसायिक शामसुंदर आणि प्रवीण खन्ना या दोघा बंधूंचा खून काही वर्षांपूर्वी तीनहात नाका परिसरात झाला होता. या प्रकरणात प्राचीचे वडील विकास झाडे यांचाही समावेश होता. मात्र, प्राचीच्या खुनाशी दुहेरी हत्याकांडाचे पूर्ववैमनस्य कारणीभूत नसल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

Web Title: Girl murdered in Thane