विद्यार्थिनीला परीक्षेस मनाई कायम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

मुंबई - हिजाब घालण्यास परवानगी दिली नाही, त्यामुळे महाविद्यालयात गैरहजर राहिले, असे सांगणाऱ्या विद्यार्थिनीला परीक्षेस बसू न देण्याचा होमिओपॅथिक महाविद्यालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज कायम ठेवला. तिची हजेरी अपुरी असल्याचे कारण न्यायालयाने मान्य केले.

वांद्रेमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. सुटीकालीन न्या. एस. जे. काथावाला यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. महाविद्यालयात हिजाब घालून येण्यास व्यवस्थापनाने परवानगी दिली नाही, त्यामुळे वर्गामध्ये बसता आले नाही, असा युक्तिवाद याचिकादार विद्यार्थिनीच्या वतीने केला होता; मात्र या भिंवडीच्या साई होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाने त्याचे खंडन केले. महाविद्यालयामध्ये कधीही अशाप्रकारे बंदी घातली नाही. अन्य विद्यार्थिनी हिजाब घालून येतात, असे या वेळी सांगण्यात आले. याचिकादार विद्यार्थिनीची हजेरी आवश्‍यक दिवसांएवढी नसल्यामुळे तिला परवानगी नाकारली, असा खुलासा महाविद्यालयाने केला. डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेस तिला बसण्याची परवानगी देऊ, असेही व्यवस्थापनाच्या वतीने ऍड. साहील साळवी यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाने याबाबत सहमती व्यक्त केली. केवळ 28 दिवस हजेरी असल्यावर विद्यार्थिनीला परवानगी देणे अयोग्य ठरू शकते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. महाविद्यालयाने दिलेली हमी विद्यार्थिनीने मान्य करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले.

Web Title: girl student exam hijab high court