टीसीच्या जागरुकतेमुळे मुलीचे अपहरणकर्ते ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

सेकंड क्‍लासच्या तिकीटावर फर्स्ट क्‍लासने प्रवास केल्यामुळे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारे दोघेजण सापडले.

मुंबई : सेकंड क्‍लासच्या तिकीटावर फर्स्ट क्‍लासने प्रवास केल्यामुळे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारे दोघेजण सापडले. नेरूळ स्थानकावर तिकीट तपासनीसाच्या जागरुकतेमुळे हे प्रकरण समोर आले. पोलिसांनी दोघा अपहरणकर्त्यांना अटक केली आहे.
नेरूळ रेल्वेस्थानकावर बुधवारी संध्याकाळी लोकलच्या फर्स्ट क्‍लास डब्यातून दोघेजण एका 15 वर्षांच्या मुलीसह उतरले. तिकीट तपासनीस आसाराम मीना यांनी त्या दोघांना तिकीट विचारले असता त्यांनी तिकीट दाखवले. मात्र, ते सेकंड क्‍लासचे असल्याने मीना यांनी दंड भरण्यास सांगितला.

दंड भरण्यास विरोध केल्याने मीना यांनी मुलीसह दोघांना तिकीट तपासनीस कार्यालयात घेऊन गेले. नेरूळचे वरिष्ठ तिकीट तपासनीस आनंद सिंह यांनी विचारपूस केल्यावर त्यांना संशय आला. त्यांनी त्या मुलीकडे विचारपूस केली असता ती समाधानकारक उत्तर देत नव्हती. त्यामुळे सिंह यांनी तिच्या वडिलांचा फोन क्रमांक घेऊन त्यांना संपर्क साधला. ती गुजरातमधील आनंद या शहरातील असून ती बेपत्ता असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.

याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सिंह यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी या दोघांवर बाल अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The girl's kidnappers in custody due to awareness of TC