तरुणींकडून फिगर मेंटेन ठेवण्यासाठी सिगारेटचा कश!

सुनीता महामुणकर
रविवार, 19 ऑगस्ट 2018

कश कशासाठी?
- भूक मरून फिगर मेंटेन ठेवण्यासाठी
- कार्पोरेट क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत कमी पडू नये म्हणून
- घरच्या शिस्तीच्या ताणातून निवांतपणा मिळवण्यासाठी
- स्टाईल मारण्यासाठी एक-दोन कशपासून सुरुवात
- चहा-सिगारेटचे कॉम्बिनेशन

मुंबई : "हर फिक्र को धुए में उडाता चला गया...' असे म्हणत सिगारेटचे कश घेत आयुष्याला सामोरे जाणाऱ्यांमध्ये तरुणींची संख्या वाढत आहे. सिगारेटमुळे फिगर मेंटेन राहते आणि "कट-टू-कट' स्पर्धात्मक लाईफ स्टाईलमध्ये टिकण्यासाठी सिगारेट ही गरज बनली आहे, असेच या तरुणींना वाटते. नशाबंदी मंडळाने केलेल्या पाहणीत हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

नशाबंदी मंडळातर्फे सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी तरुणींमधील सिगारेटच्या व्यसनासंदर्भात नुकतीच एक पाहणी केली होती. यात केवळ फॅशन म्हणून ते आजच्या स्पर्धात्मक काळातील लाईफ स्टाईलशी जुळवून घेण्यापर्यंत विविध भन्नाट कारणे तरुणींनी सांगितली. "मी फिगर मेंटेन ठेवण्यासाठी सिगारेट ओढते. कारण, त्यामुळे भूक लागत नाही, भूक मंदावल्याने डाएट करणे सोपे होते', असे धडधडीत सांगणाऱ्या तरुणीही आहेत. "घरच्या कडक शिस्तीच्या वातावरणातून महाविद्यालयात गेल्यानंतर मिळालेल्या अतिमोकळेपणामुळे सिगारेटला जवळ केले, कार्पोरेट क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत आपण कुठे कमी पडू नये, म्हणून सिगारेटची सवय लावली. सिगारेटमुळे किक लागते, कामाचा उत्साह येतो. चहा आणि सिगारेटच्या कॉम्बिनेशनमध्ये धूर शरीरात राहिल्यावर वेगळा आनंद मिळतो', अशीही कारणे मिळाली. दादरमधील एका ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी तर सिगारेट हाच निकष आहे. 

या पाहणीवेळी 18 ते 25 हा प्रमुख वयोगट ठेवला होता आणि 25 ते 35 वयोगटातील नोकरदार महिलांशीही वर्षा यांनी संवाद साधला. चर्चगेट, मरिन ड्राईव्ह, अंधेरी, घाटकोपर, दादर आदी भागांमधील काही महाविद्यालये, वस्त्या, बचतगट, महिला मंडळे आदी ठिकाणी वर्षा यांनी भेट दिली. पूर्वी तरुण मुले लपून-छपून सिगारेट ओढायचे; मात्र आता महाविद्यालयाबाहेर आणि सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्या तरुणी सर्रास दिसतात. हा बदल का झाला, या उत्सुकतेपोटी मी मुलींशी संवाद साधायचे ठरवले. आपण कुठेच मागे राहता कामा नये; मग ती सिगारेटही का असेना, अशी मानसिकता तरुणींमध्ये तयार होत आहे. सुरुवातीला ही स्टाईल आणि फॅशन वाटत असली; तरी पुढे व्यसन जडू शकते याचेही भान ठेवायला हवे, असे वर्षा म्हणाल्या. 

तरुण वयातील सिगारेट किंवा तंबाखूच्या व्यसनामुळे लग्नानंतर गर्भारपणात त्रास होऊ शकतो, असे मुलींना सांगिल्यानंतर "आयुष्य आताच एन्जॉय केले पाहिजे, समस्यांवर प्रतिबंधात्मक औषधेही आहेत की', या एका वाक्‍यावरच अनेकींनी बचाव केला. म्हणजेच, तंबाखूचे दुष्परिणाम माहीत असूनही मुली त्याकडे वळतात हे दुर्दैवच आहे, अशी खंत वर्षा यांनी व्यक्त केली. मुलींसाठी खास सिगारेटही मिळतात. मात्र, "कश' मारताना आयुष्यातील "होश' उडणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असल्याचेही वर्षा यांनी सांगितले.

वस्ती पातळीवर तंबाखू
वस्ती पातळीवरील मुलींमध्ये सिगारेटपेक्षा तंबाखूचे व्यसन मोठ्या प्रमाणात आढळते; मात्र त्याची कारणे वेगळीच आहेत. सार्वजनिक प्रसाधनगृहातील दुर्गंधी टाळण्यासाठी आम्ही तोंडात तंबाखू ठेवतो. त्यामुळे एकप्रकारे दुर्गंधी सहन करण्याची शक्तीच मिळते. त्यातूनच तंबाखूची सवय लागली, असे अनेकींनी सांगितले. आजी-आई तंबाखू खायच्या म्हणून मलाही सवय लागली, असेही काहींनी सांगितले.

कश कशासाठी?
- भूक मरून फिगर मेंटेन ठेवण्यासाठी
- कार्पोरेट क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत कमी पडू नये म्हणून
- घरच्या शिस्तीच्या ताणातून निवांतपणा मिळवण्यासाठी
- स्टाईल मारण्यासाठी एक-दोन कशपासून सुरुवात
- चहा-सिगारेटचे कॉम्बिनेशन

Web Title: girls smoking Cigarette puffs to keep the figure maintenance