'आरोपींचा कारागृहातील कालावधीचा तपशील द्या '

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

मुंबई - गुजरातमधील बिल्किस बानो बलात्कार खटल्यातील 11 दोषी आरोपींचा कारागृहातील कालावधी नक्की किती झाला आहे, याचा सविस्तर तपशील सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने "सीबीआय'ला शुक्रवारी दिले. 

मुंबई - गुजरातमधील बिल्किस बानो बलात्कार खटल्यातील 11 दोषी आरोपींचा कारागृहातील कालावधी नक्की किती झाला आहे, याचा सविस्तर तपशील सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने "सीबीआय'ला शुक्रवारी दिले. 

गुजरातमध्ये 2002 मध्ये उसळलेल्या गोध्रा दंगलीमध्ये बिल्किसवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपात विशेष न्यायालयाने 11 आरोपींना दोषी ठरविले आहे. त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची सजा सुनावली आहे. मात्र शिक्षेचा कालावधी आणि प्रत्यक्ष कारागृहात काढलेला कालावधी यामध्ये तफावत आहे, असा आरोप करणारी याचिका आरोपींच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच 11 पैकी तीन आरोपींना फाशी व्हावी, या मागणीसाठी "सीबीआयने'ही याचिका केली आहे. 

न्या. विजया ताहिलरामानी आणि न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. आरोपींना केव्हा अटक झाली आणि त्यांच्या शिक्षेचा कालावधी याबाबतची माहिती दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. बिल्किस ही अहमदाबादमधील रांधीपूरमध्ये राहणारी आहे. आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला होता आणि तिच्या घरातील सातजणांची हत्या केली होती, असा आरोप "सीबीआय'ने ठेवला आहे. 

Web Title: Give details of the amount of time accused jail