घोडागाडी मालक-चालकांना रिक्षा, टॅक्‍सी परवाना द्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

मुंबई - मुंबईचे आकर्षण असलेल्या व्हिक्‍टोरिया घोडागाडीवर बंदी घातल्यामुळे रोजगार गमावलेल्या मालक आणि चालकांना रिक्षा किंवा टॅक्‍सीचा परवाना देण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी सूचना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने केली. 

मुंबई - मुंबईचे आकर्षण असलेल्या व्हिक्‍टोरिया घोडागाडीवर बंदी घातल्यामुळे रोजगार गमावलेल्या मालक आणि चालकांना रिक्षा किंवा टॅक्‍सीचा परवाना देण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी सूचना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने केली. 

व्हिक्‍टोरिया घोडागाडीवर न्यायालयाने यापूर्वीच बंदी घातली आहे. घोडागाडी चालक-मालक घोड्यांची काळजी घेत नसल्याने त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते, असा आरोप प्राणिमित्र संघटनेने याचिकेत केला आहे. घोडागाडी मालक आणि चालकांच्या पुनर्वसन योजनेची माहिती राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाला दिली. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. सरकारची उपसमितीही योजनेवर काम करीत आहे. काही दिवसांत योजनेचा आराखडा तयार झाला की तो मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येईल, असेही कंथारिया यांनी न्यायालयाला सांगितले. योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी आणखी काही वेळ देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. 

शहरात घोडागाड्यांना पूर्णतः मनाई असली, तरी काही भागात आकर्षण म्हणून "जॉय राइड' ठेवता येईल का, यावरही उपसमितीने विचार करावा, असे खंडपीठाने सुचवले आहे. तसेच घोडागाडी बंद पडल्यामुळे मालक-चालकांच्या पुनर्वसनाचा किंवा त्यांना रिक्षा-टॅक्‍सीचा किंवा अन्य परवाना देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना न्यायालयाने केली. याचिकेची सुनावणी 2 मे रोजी आहे. त्या वेळी पुनर्वसन योजना दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. 

Web Title: Give license to Rickshaw, Taxi driver