प्लास्टिक बॉटल द्या, कचरा डबा घेऊन जा 

ठाणे : प्लास्टिक बाटल्यापासून बनवलेले ४ फुटांचे कचरा डबे.
ठाणे : प्लास्टिक बाटल्यापासून बनवलेले ४ फुटांचे कचरा डबे.

ठाणे : कितीही नाही म्हटले तरी रोजच्या वापरात प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश असल्याने आजही शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा निर्माण होत आहे. आपल्या घरातील प्लास्टिकचा आपणच पुनर्वापर करून कचरा निर्मितीवर काही प्रमाणात आळा आणू शकतो. याच कल्पनेतून ठाण्यातील "विसेक इंडिया' या संस्थेने नागरिकांना घरातील प्लास्टिकच्या बाटल्या आणा आणि त्यापासून तयार केलेला प्लास्टिक कचरा डब्बा घेऊन जा, असे आवाहन केले आहे.

ठाण्यातील विसेक इंडिया संस्थेच्या वतीने गणेशोत्सव काळात कलाभवन येथे प्लास्टिकचे दुष्परिणाम दाखविणारे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत प्लास्टिक संस्थेकडे जमा केले. आतापर्यंत संस्थेकडे 300 किलो प्लास्टिक जमा झाले आहे. प्लास्टिकचा कचरा कमी होणार नाही, प्रत्येक घरात दर आठवड्याला 200 ग्रॅम प्लास्टिक कचरा जमा होत असतो. याच प्लास्टिकचा पुनर्वापर केला तर कचरा जास्त प्रमाणात निर्माण होणार नाही, ही कल्पना संस्थेच्या सदस्यांना सुचली. "प्लास्टिकचाच पुनर्वापर करण्यास सुरुवात केली तर', या विचारातून आम्ही प्लास्टिकच्या बाटल्यांपासून चार फुटांचा प्लास्टिक कचरा संकलन डबा तयार करत आहोत. साधारण 250 ते 300 बाटल्यांपासून गोल आणि चौकोनी आकारातील डब्बे तयार केले जात आहेत. 

नागरिकांनी प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन येथे यावे. त्या बाटल्यांपासून आम्ही कचरा डब्बा तयार करून त्यांना देऊ. हा डब्बा त्यांनी सोसायटी आवारात ठेवावा आणि त्यामध्ये प्लास्टिक कचरा संकलन करावे. आम्ही जमा झालेले प्लास्टिक कचरा संकलित करण्याची जबाबदारी घेणार आहोत, असे कट्टी यांनी सांगितले. तसेच शहरातील सोसायट्यांमध्येही जनजागृती केली जात असून कलाभवन येथे सुरू असलेल्या प्लास्टिक संकलन मोहिमेत नागरिकांना याविषयी माहिती दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्लास्टिक बाटल्यांच्या झाकणापासून काही पोट्रेट तयार केले जात आहेत. त्यामध्ये महात्मा गांधी, पं. नेहरु, सावरकर यांसारख्या दिग्गजांचा समावेश असणार आहे. स्वच्छ भारत या अभियानांतर्गत हा उपक्रम सुरू असून प्लास्टिक कचरा कमी करणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. 
- विजयकुमार कट्टी, 
विसेक इंडिया संस्था 

 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com