पूरनियंत्रणासाठी उपाय सुचवल्यास लाखाचे बक्षीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पूरनियंत्रणावर उपाय सूचवा आणि एक लाखाचे बक्षीस मिळवा, अशी ‘ऑफर’ रेल्वे प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिली आहे

मुंबई : पूरपरिस्थितीत रेल्वे मार्गात मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पूरनियंत्रणावर उपाय सूचवा आणि एक लाखाचे बक्षीस मिळवा, अशी ‘ऑफर’ रेल्वे प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिली आहे. मध्य आणि पश्‍चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी संबंधितांना मोबाईलवर संदेश पाठवून हे आवाहन केले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात विशेषत: मध्य रेल्वेचे कंबरडे मोडले. पुरामुळे बदलापूरपुढे रेल्वेचे कोट्यवधींचे नुकसान झाले. तीन दिवस लोकल सेवा ठप्प होती. मुंबईतही कुर्ला-शीव स्थानकादरम्यान रेल्वेमार्गात प्रचंड पाणी साचले होते. दर वर्षी पावसात अशीच परिस्थिती उद्भवत असल्याने रेल्वे ठप्प पडल्यानंतर मुंबईतील आर्थिक नाड्यांचीही कोंडी होते. तसेच जगभरात रेल्वेची नाचक्की होते. त्यामुळे ए. के. गुप्ता यांनी रेल्वेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपाय सुचवण्याचे आवाहन केले आहे. उत्तम उपाय सुचवणाऱ्यास एक लाखापर्यंतचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुंबईची भौगोलिक रचना माहीत आहे. तसेच रेल्वेमार्गाची रचनाही माहीत आहे. त्यामुळे तुम्ही चांगला उपाय सुचवू शकता, असे आवाहन गुप्ता यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: GIVE SUGGESTION TO RAILWAY FOR MUMBAI FLOOD