अनाथालयातील मुलांसाठी कौशल्य प्रशिक्षण सुरू करा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

मुंबई-  अनाथालये व बालसुधारगृहांतील मुलांना निरोगी वातावरणात शिक्षण मिळावे, त्यांचे व्यक्तिमत्व विकसित व्हावे, यासाठी राज्य बालहक्क आयोग सरकारला कौशल्य विकास विभाग स्थापन करण्याची शिफारस करणार असल्याची माहिती राज्य बालहक्क आयोगाचे सचिव ए. एन. त्रिपाठी यांनी शनिवारी (ता. 19) दिली.

आंतरराष्ट्रीय बालहक्क दिनानिमित्त पवईत राष्ट्रीय बालहक्क आयोग, राज्य बालहक्क आयोग आणि "सेव्ह द चिल्ड्रन' यांनी लहान मुलांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी राज्यस्तरीय परिषद घेतली. त्या वेळी त्रिपाठी यांनी ही माहिती दिली. परिषदेत दुर्लक्षित मुलांची काळजी आणि संरक्षण यावर चर्चा झाली. यात झोपडपट्ट्या, चाळींमधील मुलांचा शैक्षणिक दर्जा आणि आरोग्याचा आलेख उंचावण्यासाठी आवश्‍यक ती पावले उचलण्याबाबत चर्चा झाली. नैसर्गिक आपत्ती व मानवी आपत्तीपासून दुर्लक्षित मुलांचे कसे संरक्षण करता येईल, यावरही प्रथमच चर्चा करण्यात आली.

मुलांवर शाळेतच संस्कार होणे आवश्‍यक आहे. गोष्टी व मनोरंजनाच्या अन्य माध्यमांतून आपली संस्कृती मुलांना समजावून देता येईल, असेही त्रिपाठी म्हणाले. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास विभाग सुरू करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी बालहक्क क्षेत्रातील कार्यकर्त्यांना उपयुक्त ठरणाऱ्या फेलिसिटेटर्स गाईड या पुस्तकाचे प्रकाशनही झाले.

Web Title: give training to orphanages