गोव्यातील नेत्यांचेही फोन टॅप; संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांचा आरोप; देवेंद्र फडणवीसांना टोला
Goa leaders Phone taps Devendra Fadnavis Sanjay Raut mumbai
Goa leaders Phone taps Devendra Fadnavis Sanjay Raut mumbai esakal

मुंबई : गोव्यातही फोन टॅपिंगचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबविला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे गोव्यात प्रभारी असल्याने तेच फोन टॅपिंग करण्यासारख्या कामांमध्ये गुंतले असल्याचा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावला. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा चारच दिवसांनी निकाल येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गोव्यामध्ये भाजपने काँग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, ‘‘दोन दिवसांपूर्वी मला काँग्रेसचे नेते दिगंबर कामत भेटले होते. तेव्हा कामत यांनी आपला फोन टॅप होत असल्याची शंका व्यक्त केली. त्यावेळी त्यांना केवळ तुमचाच नव्हे तर सुदिन ढवळीकर आणि विजय सरदेसाई यांचेही फोन भाजपकडून टॅप केले जात आहेत, असे मी सांगितले. भाजपला राज्यपाल, केंद्रीय तपासयंत्रणा आणि फोन टॅपिंगच्या माध्यमातून गोव्यात सत्ता आणायची आहे. महाराष्ट्रात त्यांनी हे सगळे प्रकार केले. मात्र, महाविकास आघाडीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे आता भाजपने ‘केजीबी’ आणि ‘सीआयए’ या संस्थांनाही मदतीसाठी घ्यावे.’’

ही तर पूर्वतयारी

संजय राऊत यांनी गोव्यात भाजपची सत्ता येणार नसल्याचे भाकीत केले आहे. मात्र, १० मार्चनंतर गोव्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास केंद्रीय तपासयंत्रणा गोव्यातही सक्रिय होतील. फोन टॅपिंग ही त्याची पूर्वतयारी आहे, असा दावा राऊत यांनी केला. गोव्यातील भाजप विरोधकांचे फोन टॅप करणारी व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी फडणवीस यांच्याकडे लक्ष वेधले.

माझाही फोन टॅप

संजय राऊत म्हणाले, ‘‘माझा फोन आताही टॅप केला जात आहे. २०१९मध्ये विधानसभा निवडणुकीनंतरच्या सत्तानाट्यावेळी माझा आणि नाना पटोले यांचा फोन टॅप होत होता. मात्र, मी माझा नंबर किंवा फोन बदललेला नाही. त्यांना जे ऐकायचे ते ऐकू द्या.’’ नवाब मलिक-दाऊद इब्राहिम धागेदोऱ्यावरून भाजप मुंबईत वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत अजिबात दहशतवाद नाही. भाजपने कितीही वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला तरी जनता त्याला भुलणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com