ठाण्यात ईदनिमित्त बोकडांचे रॅम्प वॉक

रॅम्प वॉकमध्ये सहभागी बोकड. (छायाचित्र - दीपक कुरकुंडे)
रॅम्प वॉकमध्ये सहभागी बोकड. (छायाचित्र - दीपक कुरकुंडे)

ठाणे : रॅम्प वॉक म्हटल्यावर मॉडेल, अभिनेत्री, अभिनेते आदींचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. ठाण्यातही असाच एक अनोखा बोकडांचा "रॅम्प वॉक' पार पडला. ज्यात चक्क सुलतान, शाहरुख, टायगर, किंग, गब्बर, पांडा आदी नामकरण केलेल्या बोकडांचा रॅम्प वॉक पाहून उपस्थितही आवाक्‌ झाले. 

दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे राज्यात बळिराजा आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असताना ठाण्यातील फैज अहमद शेख या उद्यमशील शेतकऱ्याने सरकारच्या कुठल्याही मदतीशिवाय पशूपालन व्यवसायाला ग्लोबल स्वरूप देऊन प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. त्यांनी नैसर्गिकरित्या बकरी पालनाचा व्यवसाय सफल करून दाखवला आहे. 12 ऑगस्टला असलेल्या बकरी ईदनिमित्त त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या बकऱ्यांचे आकर्षक नामकरण करून ठाण्यात चक्क "रॅम्प शो' केला. 

ठाण्यात बांधकाम व्यावसायिक असलेले फैज शेख यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्‍यातील सायगव्हाण या मूळगावी एफ. ए. गोट फार्म उभारून पशुपालन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यांच्या फार्महाऊसमध्ये पहिल्या वर्षी तब्बल शंभरहून अधिक बकऱ्यांची पैदास झाली. बकरी ईद या सणाचे औचित्य साधून त्यांनी ठाण्यात आगळ्यावेगळ्या पद्धतीने बकऱ्यांची विक्री सुरू केली आहे.

पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने त्यांनी बकऱ्यांचा "रॅम्प शो' ठाण्यात भरवला होता. यात सुलतान, शाहरुख, टायगर, किंग, गब्बर, पांडा आदी नामकरण केलेले विविध जातीचे 32 प्रकारचे बोकड सहभागी झाले होते. बकऱ्यांच्या या आगळ्यावेगळ्या "शो'मुळे हौश्‍या, नवश्‍या, गवश्‍यांसह बोकड खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. 

-----             -------                     -------                   ----------

संगोपन करण्यासाठी प्रत्येक बकऱ्यांच्या मागे 650 ते 700 रुपये खर्च येतो. कुठल्याही प्रकारची वजन वाढविण्याची अनैसर्गिक औषधे न देता शेतीमध्ये उत्पादित केलेले गवत, धान्य, डाळी इ. आहार देऊन पालनपोषण केलेले बोकड ठाण्यात आयोजित केलेल्या रॅम्प शोच्या माध्यमातून विक्रीसाठी ठेवले आहेत. 
फैज शेख, उद्यमशील शेतकरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com