लवकर करा सोने खरेदी! दिवाळीपर्यंत सोने जाणार 40 हजारांवर

gold prices will be increase in Diwali goes upto 40 thousand
gold prices will be increase in Diwali goes upto 40 thousand

मुंबई : अमेरिका-चीनमधील व्यापारसंघर्ष, अर्थव्यवस्थेतील मरगळ यांमुळे भांडवली बाजारात एकीकडे गुंतवणूकदारांची होरपळत सुरू असताना सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोने खरेदी करणाऱ्यांना लवकरच "अच्छे दिन' येण्याचे संकेत आहेत. कारण दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 40 हजार रुपयांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 

सद्यःस्थितीत या मौल्यवान धातूला असलेली मागणी पाहता, त्यातून गुंतवणूकदारांच्या भविष्यातील अपेक्षा प्रतिबिंबित होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे भाव नवनव्या उच्चांकाला गवसणी घालत आहेत. दिल्ली सराफा बाजारात प्रतिदहा ग्रॅम सोन्याचा भाव 38,570 रुपये; तर एक किलो चांदीचा भाव 45,000 रुपयांवर पोचला आहे. मागणीतील सातत्य असेच टिकून राहिले, तर दिवाळीपर्यंत सोने 40 हजारांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

अमेरिका-चीन व्यापारसंघर्ष निवळल्यास मौल्यवान धातूंची मागणी किचिंत घटेल. मात्र, सद्यःस्थिती पाहता अशी शक्‍यता धूसर वाटते. त्यामुळे दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 39 ते 40 हजारांवर गेल्याचे पाहायला मिळू शकेल. 
- अनुज गुप्ता, एंजल ब्रोकिंग 

भाववाढीमागील कारणे 
- मध्यवर्ती बॅंकांकडून व्याजदरकपात 
- अर्थव्यवस्थेची अवस्था डळमळीत 
- जागतिक पटलावरील राजकीय उलथापालथ 
- जर्मन, ब्रिटन अर्थव्यवस्थेची सुमार कामगिरी 
- चीनच्या औद्योगिक उत्पादनातील घसरण 
- अमेरिकेतील रोखे उत्पन्नात 2007 नंतर नीचांकी घसरण 

गुंतवणूक नव्हे; हा तर विमा! 
अनिश्‍चिततेच्या काळात सोने व इतर मौल्यवान धातूंची खरेदी ही केवळ गुंतवणूक नव्हे, तर आर्थिक अस्थिरतेत तग धरण्यासाठी काढलेला एक प्रकारचा विमाच आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मुक्तहस्ताने त्याची खरेदी करावी, असा सल्ला जागतिक पातळीवरील तज्ज्ञ देत आहेत. 

...तर जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या कचाट्यात 
अमेरिकेने चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या सर्व उत्पादनांवरील आयात शुल्क 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविले, तर त्याचा विपरीत परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याचा इशारा मॉर्गन स्टॅन्ले या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिला आहे. आगामी तीन तिमाहींत जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या कचाट्यात सापडेल, असेही या संस्थेने म्हटले आहे. 

जुलैत मागणी घटली 
ऐतिहासिक पातळीवर पोचलेल्या सोन्याच्या भावामुळे ग्राहकांनी गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात आपले जुने सोने विक्रीसाठी बाहेर काढले. त्याचा परिणाम मागणीवर झाला. यामुळे जुलैत सोन्याची आयात 42 टक्‍क्‍यांनी घटत 1.72 अब्ज डॉलरवर आली. तत्पूर्वी, दुसऱ्या तिमाहीतील देशातील सोने मागणी 12 टक्‍क्‍यांनी वाढून 168.8 टनांवर गेली होती. एप्रिल ते जूनदरम्यान जगभरातील मागणीत 8 टक्‍क्‍यांची वाढ होत ती 1123 टनांवर पोचल्याचे स्पष्ट झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com