विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक, महिलांना सुगीचे दिवस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असून जास्तीत जास्त मते मिळवण्यासाठी उमेदवार प्रचार रॅली काढून मतांचा जोगावा मागत आहेत. या प्रचार रॅलीमध्ये पक्षांचे कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होत नसल्याने उमेदवारांकडून प्रचारार्थ महाविद्यालयीन तरुणांसह ज्येष्ठ नागरिक, महिलांचा वापर केला जात  आहे.

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असून जास्तीत जास्त मते मिळवण्यासाठी उमेदवार प्रचार रॅली काढून मतांचा जोगावा मागत आहेत. या प्रचार रॅलीमध्ये पक्षांचे कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होत नसल्याने उमेदवारांकडून प्रचारार्थ महाविद्यालयीन तरुणांसह ज्येष्ठ नागरिक, महिलांचा वापर केला जात  आहे.

प्रचार रॅली, राजकीय सभा व पत्रके वाटण्यासाठी निवडणुकीतील उमेदवाराला मनुष्यबळाची आवश्‍यकता असते. सध्या हाडाचा कार्यकर्ता ही म्हण इतिहासजमा झाली आहे. नेता वेळेनुसार पक्षांचा झेंडा बदलत असल्याने कार्यकर्त्यांनीदेखील पक्षांसह उमेदवारांची तळी उचलणे बंद केले आहे. उमेदवार निवडून आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने कार्यकर्तेदेखील निवडणुकीत आपले हात ओले करून घेण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे उमेदवारांकडून महाविद्यालयीन तरुणांचा प्रचारार्थ वापर केला जात आहे. या विद्यार्थ्यांना प्रचारात सहभागी होऊन दिवसाला ३०० ते ५०० रुपये रोज मिळत आहे, त्यामुळे तेदेखील आंनदी आहे. ज्येष्ठ नागरिकदेखील स्थानिक राजकीय नेत्यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन प्रचारात सहभागी होऊन पैसे घेत असल्याचे दिसून येत आहे.

पूर्वी फक्त झोपडपट्टीमधील रहिवासी प्रचार रॅलीमध्ये फिरण्याचे पैसे आकारत होते; मात्र आता उच्चभ्रू म्हणवून घेणाऱ्या सोसायट्यांमधील महिला, महाविद्यालयीन तरुण-तरुणीदेखील प्रचाररॅलीत सहभाग घेऊन पैसे घेत असल्याचे दिसून येत आहे. मतदारांनी कोणालाही मते द्यावीत; मात्र प्रचार रॅलीत फिरून दोन पैसे कसे मिळतील याकडे तरुणाईसह ज्येष्ठ नागरिक व महिलांचा कल दिसून येत आहे.  महिला प्रामुख्याने घरात बसून काय करायचे, यापेक्षा प्रचारात फिरून दिवाळी सुखात जाईल, या विचारात असल्याचे आढळून येत आहे.

ग्रामीण भागातून माणसांची मागणी
शहरी भागात प्रचारात सहभाग घेऊन दररोज ३०० ते ५०० रुपयांपर्यंत रोज मिळत असल्यामुळे गावाकडूनदेखील मुंबईकडे माणसे मागवली जात आहेत. त्यामुळे त्यांनादेखील रोजगार उपलब्ध होत आहे, असे एका पक्षाच्या नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

चायनीज कॉर्नर, बार फुल
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून पक्षाचे पदाधिकारी हे प्रचाराची रॅली संपल्यांनतर मद्यपान करण्यासाठी चायनीय कॉर्नर तसेच बारकडे मोर्चा वळवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चायनीज कॉर्नर व बार फुल आहेत; तर निवडणुकांमुळे चायनीज कॉर्नरवाल्यांचीदेखील चलती होत असून, रोजच्यापेक्षा जास्त व्यवसाय होत असल्याचे चायनीज विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. बारमध्येदेखील मद्यपान करणाऱ्यांची संख्या वाढली असून, बारदेखील फुल दिसून येत आहेत. वाईन शॉपवरदेखील गर्दी दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good day for students, Senior citizens, and women