अक्षर... एक संस्कार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने ख्यातनाम सुलेखक अच्युत पालव यांनी त्यांच्या अक्षर आठवणींना दिलेला उजाळा... 

जे देखताच चतुर... समाधान पावती 

जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने ख्यातनाम सुलेखक अच्युत पालव यांनी त्यांच्या अक्षर आठवणींना दिलेला उजाळा... 

23 जानेवारी... जागतिक हस्ताक्षर दिन. यानिमित्ताने लिहायला घेतलं तेव्हा परत एकदा शाळेतले दिवस आठवले. इयत्ता चौथीपर्यंत पाटीवर काही अभ्यास, तर थोडासा वहीत, पाटीवर उजव्या बाजूला कोपऱ्यात नाव, इयत्ता, हजेरी क्रमांक... एखाद्या इंचाची जागा सोडून मग लिहायला सुरुवात... पाटीच्या डाव्या बाजूला समास... दोन ओळीमध्ये अंतर असावं, लिहिलेलं वाचता आलं पाहिजे, पुढे आणि मागे म्हणजे पाठपोठ लिहिल्यानंतर ते पुसलं जाणार नाही, याची काळजी घेऊन गुरुजींना दाखवायचे. 
काळ्याकुट्ट दगडाच्या पाठीवर शिसपेन्सिलला टोक काढून लिहिण्याची मजा काही वेगळीच होती. गुरुजींचा आवडता सुविचार म्हणजे सुंदर अक्षर हाच खरा दागिना... वर्षानुवर्षे अनेक विद्यार्थ्यांच्या हातातून लिहून मनात प्रवेश करून पुढे मनावर राज्य करणारा हा विचार... आज मागे वळून पाहिलं तेव्हा मी नक्की वेगळं काय केलं, असं विचारलं तर जे तेव्हा केलं तेच आज करतोय... लिहिण्याची पद्धत बदलली आहे. वेगवेगळ्या शैली विकसित झाल्यात आहेत... पाटी जाऊन कागद आला... मग संगणक आला... आणि आता टॅब... पण, जे सुंदर आणि सुवाच्च अक्षर लिहिण्याचा विचार जो होता तो आजही आहे... माझ्या मते तो एक संस्कार होता... आणि यापुढेही राहील. 

प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळा आणि मग हायस्कूल, वर्ग बदलले... शब्द बदलले... इतिहास, भूगोल इयत्तेप्रमाणे बदलू लागला; पण सुंदर अक्षरांचा संस्कार मात्र तसाच होता... 7वीला असताना सामुदायिक जीवन नावाची चिकटवही... देशभक्तांची चित्रे वहीत चिकटवून त्यांची माहिती सुंदर सुवाच्च अक्षरात लिहून काढायचो... नकळतपणे आपले अक्षर सुंदर आहे की नाही याची पर्वा न करता... 

मनात जे होतं ते लिहिलं आणि इतक्‍या वर्षांत आपल्यावर थोडाफार का होईना अक्षर संस्कार झाला याची कल्पना आली. शाळेत येता-जाता कबड्डीच्या सामन्यांचे फलक किंवा शिवसेनेच्या शाखांचे फलक नकळतपणे सुंदर अक्षरांचा विचार आणि संस्कार मनावर रुजवून गेले... पुढे के. एम. एस. डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये प्रवेश केला... शाळेच्या फळ्यावर सुंदर सुविचार लिहिण्याची सुवर्णसंधी मला मिळाली... अचानक वहीमध्ये लिहिलेली अक्षरे मोठी झाली. मुलगा-मुलगी वयात येताना जे बदल घडतात ते मला माझ्या अक्षरांमध्ये दिसू लागले. फळ्यावर सुविचार लिहिताना विचारांची निवड करून ते योग्य रीतीने मांडले पाहिजेत... वाचले गेले पाहिजेत आणि सुंदरही दिसले पाहिजे. मला वाटतं हीच बालवयातून पौगंडावस्थेत प्रवेश करण्याची प्रक्रिया असते... 
8 वी ते 10 वी हा माझ्यासाठीचा एक खूप महत्त्वाचा टप्पा... जिथे मी अनेक विचार-सुविचार फळ्यावर लिहिले... सांस्कृतिक कार्यक्रमाचे फळे लिहिताना माझ्यातला स्वैरपणा मी अक्षरांच्या वळणांसाठी वापरत गेलो. हळूहळू स्पेसचा वापर कसा करावा हे त्या स्पेसमध्ये राहूनच शिकत गेलो. संस्कार हे नकळतपणे होत असतात. माझ्यावरच्या अक्षर संस्काराने मला काय दिले असेल तर आत्मविश्‍वास. कुठलीही गोष्ट येते किंवा येत नाही याचा विचार न करता सहज आपण ती करू शकतो... 
याच आत्मविश्‍वासाच्या जोरावर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश केला. पौगंडावस्थेची पुढची स्टेप इथे सुरू झाली. या देशातील ज्येष्ठ सुलेखनकार प्रा. र. कृ. जोशी याचं दर्शन झालं. विचार ऐकले. प्रात्यक्षिक पाहिलं आणि माझ्या अक्षरांवर नकळतपणे पुढचे संस्कार सुरू झाले. एक अक्षर एक डिझाईन असा प्रवास सुरू झाला. अक्षरांना आवाज असतो. पॉझिटिव्ह-निगेटिव्ह स्पेस असते. उंची, जाडी, रुंदी आणखी बरंच काही कळायला लागलं. मनातील बऱ्याच शंकांचं निरसन होऊ लागलं. अक्षरांशी नाती घट्ट होऊ लागली. कारण या देशात भाषा खूप आहेत. लिप्या आहेत. 
देश शेतीप्रधान आहे तसा तो लिपीप्रधान आहे. 2007 साली अक्षर कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने काश्‍मीर ते कन्याकुमारी हा कॅलिग्राफी रोडवेज नावाचा उपक्रम राबविला. संपूर्ण देशात फिरलो. अक्षरांची देवाण-घेवाण करायची होती. इतर भाषांतील वळणांबरोबरच त्याची सुंदरता जाणून घ्यायची होती. मनातल्या आकारांना एक वळण द्यायची इच्छा होती. आणि खरोखरच मनासारखं झालं. विविध आकारांचं, विविध भाषांचं, विविध लिप्यांचं एवढा मोठा संस्कार माझ्या मनावर झाला आहे की, मी आणि अक्षरं एकवटून गेलो. अक्षराचा एक भाग म्हणून जगू लागलो. शेवटी कळत-नकळतपणे समर्थ रामदासांनी दासबोधात लिहिलेल्या अक्षर समासातील ब्राह्मणे बाळबोध अक्षर। घडसून करावे सुंदर। जे देखताचि चतुर। समाधान पावती। या ओळींचं स्मरण केल्याशिवाय संस्कार पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही.  

 
 

Web Title: good handwriting