खूशखबर! खास महिलांसाठी धावणार बेस्टच्या 'तेजस्विनी'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 जुलै 2019

बेस्ट प्रशासन ४०० वातानुकूलित मिनी बसेस भाडेतत्वावर घेत असताना, खास महिलांसाठी डिझेलवर चालणाऱ्या ३७ मिडी बसेस घेणार आहे. या बसना तेजस्विनी असे नाव देण्यात आले आहे.

मुंबई - बेस्ट प्रशासन ४०० वातानुकूलित मिनी बसेस भाडेतत्वावर घेत असताना, खास महिलांसाठी डिझेलवर चालणाऱ्या ३७ मिडी बसेस घेणार आहे. या बसना तेजस्विनी असे नाव देण्यात आले आहे.

दिवसेंदिवस बेस्ट बसेसमधून महिला प्रवाशांची वाढती संख्या पाहता त्यांच्यासाठी स्वतंत्र  बसेस चालवणे गरजेचे होते. प्रत्येक आगारतुन या बसेस सोडण्यात येणार आहेत. आज झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत तेजस्विनी बस  खरेदीचा प्रस्ताव मंजूर झाला.

येत्या तीन महिन्यात एकूण ३७ तेजस्विनी बसगाड्या दाखल होणार आहेत. प्रति बसची किंमत २९  लाख ५० हजार इतकी आहे. व्ही इ कंपनीतर्फे या बसेस खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी ११ कोटी रुपये खर्च येणार आहे. वर्दळीच्या वेळी काही बेस्ट मार्गावर महिला विशेष बस चालवण्यात येतात. मात्र महिलांसाठी संपूर्ण दिवस बस चालवण्याची मागणी होत होती. महाराष्ट्र शासनाच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत दिलेल्या निधीतून बेस्ट या बस खरेदी करणार आहे.

या बस फक्त कुलाबा आणि दादर पुरत्या मर्यादित न ठेवता बेस्टच्या 27 आगारात चालवण्यात याव्यात, अशी सूचना बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी प्रशासनाला दिली आहे. बेस्ट प्रशासन ४०० बसेस भाड्याच्या घेत असताना तेजस्विनी मात्र बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या राहणार आहेत. भाड्याच्या ४०० बसेसवर  चालक ठेकेदाराचे राहणार आहेत, मात्र तेजस्विनीवर चालक-वाहक बेस्टचेच राहणार आहेत. त्यामुळे बेस्टचे खासगीकरण होणार, ही भीती निराधार असल्याचे यातून स्पष्ट होते हीच कामगारांच्या दृष्टीने समाधानाची बाब असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. मात्र मुळातच चालक-वाहकांची कमतरता असताना तेजस्विनीवर चालक-वाहक कोणते नेमणार हा प्रश्न कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news ! Tejaswini Busses run for women in Mumbai