एसटीवर प्रवाशांची कृपा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

गणेशोत्सवानिमित्त १७५० जादा बसगाड्या आरक्षित

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने कोकणासाठी २२०० जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. त्यापैकी १७५० बसगाड्या आरक्षित झाल्या आहेत. आतापर्यंत ९६० बसगाड्यांचे ‘ग्रुप बुकिंग’ झाल्याची माहिती महामंडळातर्फे देण्यात आली. 

एसटी बसगाड्यांच्या गट आरक्षणाला यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतून २२०० जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबई सेंट्रल, कुर्ला, परळ आदी एकूण १४ ठिकाणांहून या जादा बसगाड्या सोडण्यात येतील. ‘ग्रुप बुकिंग’ सुविधा २० जुलैपासून; तर अन्य बसगाड्यांचे आरक्षण २७ जुलैपासून सुरू झाले आहे. परतीच्या प्रवासासाठी ७ ते १२ सप्टेंबर या काळात कोकणातील स्थानिक बसस्थानकांतून जादा बसगाड्या सोडण्यात येतील. गणेशोत्सवासाठी आतापर्यंत १७५० जादा बसगाड्यांचे आरक्षण झाले असून, १० दिवसांत ९६० बसगाड्यांचे ‘ग्रुप बुकिंग’ झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी एकूण १३१० बसगाड्यांचे ‘ग्रुप बुकिंग’ झाले होते. ही संख्या यंदा वाढण्याची शक्‍यता आहे. अन्य १५३ बसगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असून, ६३७ बस अंशत: आरक्षित झाल्याची माहिती एसटी आधिकाऱ्यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good response for st booking