सिगरेटसाठी माल आणि हॅश कोडवर्ड, चॅटसंदर्भात दीपिकाची चौकशीत माहिती

अनिश पाटील | Wednesday, 30 September 2020

अभिनेत्री दीपिका पदुकोणने माल हा शब्द सिगरेटसाठी वापरल्याचे केंद्रीय अंमली विरोधी पथकाला(एनसीबी) चौकशीत सांगितले आहे.

मुंबई: अंमली पदार्थांच्या सेवनाबद्दल नकार देणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणने माल हा शब्द सिगरेटसाठी वापरल्याचे केंद्रीय अंमली विरोधी पथकाला(एनसीबी) चौकशीत सांगितले आहे. तिच्या मॅनेजरसोबत झालेल्या चॅटबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते सर्व सिगरेटचे कोडवर्ड असल्याचे दीपिकानं चौकशीत सांगितल्याचं एनसीबीतील सूत्रांनी दिली.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मोठे बॉलिवूड सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यापैकी काही जणांची आता चौकशी सुरू आहे.  यापूर्वी दीपिका पदुकोण, सारा अली खानसह काही अभिनेत्रींची याप्रकरणी एनसीबीने चौकशी केली होती. 

दीपिकाची मॅनेजर करिष्मा प्रकाशसोबत झालेल्या चॅटवरून एनसीबीने पाच तास दीपिकाची चौकशी केली होती. त्यावेळी दीपिकाने 2017 मधील हे चॅट आपलेच असल्याचे मान्य केले. मात्र ड्रग्स सेवनाच्या आरोपांना नकार दिला. त्यात माल आणि हॅश हे सिगरेटसाठी सांकेतिक शब्द असल्याचे तिने स्पष्ट केले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिगरेटसाठी माल, पातळ सिगरेटसाठी हॅश, जाड सिगरेटसाठी वीड या शब्दांचा वापर करण्यात आल्याचं तिनं स्पष्ट केले. तसेच डूब हा सांकेतिक शब्दही सिगरेटसाठी वापरण्यात आल्याचे सांगितले आहे. त्या व्यतिरिक्त ड्रग्स सेवनाशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे तिने सांगितले आहे. 

अधिक वाचाः  NCB चा तपास होणार अधिक वेगवान; कोरोनाग्रस्त 20 अधिकारी लवकरच सेवेत रुजू होणार

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबी  रियाप्रमाणे इतर अभिनेत्रींच्या मोबाईलमधील डिलीट डेटा मिळवणार आहे. त्यासाठी इमेजिंग तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर रकूल प्रीतसिंह, सिमोन खंबाटा, करिष्मा प्रकाश आणि जया साहा यांचे मोबाईल फोन एनसीबीने जप्त केले होते. या मोबाईल फोनमधील डाटाच्या आधारे ड्रग्ज प्रकरणात गुंतलेल्या बड्या नावांचाही खुलासा होण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर डिलीट केलेला मोबाईलमधील डाटा देखील परत मिळवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती एनसीबी सूत्रांनी दिलीय. त्यासाठी सायबर न्यायवैधक विभागाची मदत घेण्यात येणार आहे. 

अधिक वाचाः धोकादायक इमारतींच्याविरोधात महापालिकेची नोटीस; थेट वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यास सुरुवात

एनसीबी या सर्व मोबाईलमधील डाटा क्लोनींग करून डिलीट संदेश मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या सहाय्याने यापूर्वीच चॅट व इतर व्यक्तींसोबत झालेल्या चॅटची तपासणी करण्यात येईल.तसेच त्यांच्या बँक खात्याची गेल्या तीन वर्षातील व्यवहार तसेच इतर व्यवहारांची तपासणी करण्यास एनसीबीने सुरुवात केली आहे. 

--------------------

(संपादनः पूजा विचारे)

Goods and hash codewords for cigarettes Deepika interrogation information