सिंधी समाजातील "गुगल"ची उल्हासनगर भेट

दिनेश गोगी
गुरुवार, 7 जून 2018

देशातील नामचीनांचे नंबर तोंडपाठ, देशात सिंधी समाजाची 90 लाख लोकसंख्या

उल्हासनगर - महाराष्ट्रासह देशात सिंधी समाजाची शहरानुसार किती लोकसंख्या आहे, नगरसेवक, मोठे व्यापारी, बडे नामचीन असामी, प्रख्यात राजकीय मंडळी यांची माहिती ठेवताना त्यांचे मोबाईल नंबर तोंडपाठ असणारे आणि त्यामुळे सिंधी समाजातील "गुगल" म्हणून ओळखले जाणारे दीपक चांदवानी यांनी काल उल्हासनगरला भेट दिली.

दीपक चांदवानी हे भुसावळचे रहिवासी आहेत. वडिलांचे निधन झाल्यावर त्यांनी 1990 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे भारत भारती हायस्कूलमध्ये असलेल्या प्रिन्सिपलच्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर देशभरात असणाऱ्या सिंधी समाजाच्या लोकसंख्येची गणना सुरू केली.त्यासाठी त्यांनी संपूर्ण देशातील प्रमुख शहरे पिंजून काढली. महत्वाच्या व्यक्तिमत्वाचे मोबाईल क्रमांक संग्रही केले. या समन्वयाकरिता चांदवानी यांनी पदरमोड करून सलग 15 वर्ष ट्रेन, बस, रिक्षातुन खडतर प्रवास केला. देशातील सिंधी बांधवांच्या कोणकोणत्या घडामोडी सुरू आहेत ही माहिती प्रत्येक शहरातील बांधवांना उपलब्ध व्हावी म्हणून दीपक चांदवानी यांनी एक हिंदुस्थान साप्ताहिक समाचार पत्रिका सुरू केली. या साप्ताहिकाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. या माध्यमातून त्यांनी सिंधी बांधवांना एकवटवण्याचा सकारात्मक प्रयत्न कायम ठेवला आहे.

दोन दिवसांपूर्वी उल्हासनगरात सिंधी काव्य संमेलन पार पडले. त्यात सहभागी होण्यासाठी आलेले चांदवानी यांनी पालिकेत सभागृहनेते जमनादास पुरस्वानी, नगरसेवक मनोज लासी यांची भेट घेतली. यावेळी नगरसेवक हरेश उदासी,माजी नगरसेवक होशियार सिंग लबाना उपस्थित होते.

Web Title: "Google" in Sindhi community visit Ulhasnagar