सरकारी अधिकारी-कर्मचारी लग्नसोहळ्यात व्यग्र 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

घाटकोपर - अंधेरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या मुलीच्या लग्नसोहळ्याला विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हजेरी लावल्याने बुधवारी दुपारी संपूर्ण कार्यालय ओस पडले होते. त्यामुळे कामे घेऊन कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना हात हलवतच माघारी जावे लागत होते. 

घाटकोपर - अंधेरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या मुलीच्या लग्नसोहळ्याला विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हजेरी लावल्याने बुधवारी दुपारी संपूर्ण कार्यालय ओस पडले होते. त्यामुळे कामे घेऊन कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना हात हलवतच माघारी जावे लागत होते. 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली बुधवारी अंधेरी-पश्‍चिम येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उत्तर मुंबई कार्यालयात अर्ज देण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना तेथे संपूर्ण कार्यालय रिकामे दिसले. याबाबत त्यांनी तेथील एका शिपायाकडे चौकशी केली असता, त्याने कार्यालयातील सर्व कर्मचारी लग्नसोहळ्याला गेले आहेत. तुम्ही दुपारनंतर या, असे सांगितले. गलगली यांनी शिपायाला विनंती केल्यानंतर त्याने दुसऱ्या मजल्यावरील एका कर्मचाऱ्याकडे नेले. त्याने गलगली यांचा अर्ज घेतला; पण त्यावर शिक्का दिला नाही. शिपायाने शिक्का शोधण्याच्या प्रयत्न केला; पण त्यास तो सापडला नाही. यावर त्या कर्मचाऱ्याने शिक्का ज्यांच्याकडे असतो, त्यांच्याच मुलीचे लग्न असल्याने त्या सुटीवर असल्याचे सांगितले. बुधवारी दुपारी गलगली यांच्याप्रमाणे अनेक नागरिक आपली कामे घेऊन कार्यालयात आले होते. त्यांना शिपायांनी दुपारनंतर या, असे सांगत माघारी धाडले होते. अनेक नागरिक हे कामावर अर्ध्या दिवसाची सुट्टी काढून आल्याने त्यांना दुपारनंतर पुन्हा येणे शक्‍य नसल्याने त्यांची सुट्टी फुकटच गेली. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी लग्नसोहळ्यात आणि नागरिकांची वरात, अशी अवस्था सर्वसामान्यांची झाली होती. 

अनिल गलगली यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, प्रधान सचिव आशीष कुमार सिंह यांस एसएमएसद्वारे तक्रार करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली 

Web Title: government officer busy wedding ceremony