उल्हासनगरात शासकीय कार्यालये एकाच छताखाली असणारी इमारत अंतिम टप्प्यात

दिनेश गोगी
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

उल्हासनगरात सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय, बांधमापन कार्यालय, नागरी संरक्षण कार्यालय, राज्य उत्पादन कार्यालय, शिधावाटप कार्यालय, आदी शासकीय कार्यालये ही वेगवेगळ्या ठिकाणी आणि लांबच्या अंतरावर असल्याने या कार्यालयातून त्या कार्यालयात जाताना नागरिकांच्या खिशाला भुर्दंड पडत होता.

उल्हासनगर - शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या प्रशस्त इमारतीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या इमारतीत सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली असणार असून नोव्हेंबरमध्ये या इमारतीचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

उल्हासनगरात सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय, बांधमापन कार्यालय, नागरी संरक्षण कार्यालय, राज्य उत्पादन कार्यालय, शिधावाटप कार्यालय, आदी शासकीय कार्यालये ही वेगवेगळ्या ठिकाणी आणि लांबच्या अंतरावर असल्याने या कार्यालयातून त्या कार्यालयात जाताना नागरिकांच्या खिशाला भुर्दंड पडत होता. नागरिकांची ही व्यथा गृहीत धरून आ. डॉ. बालाजी किणीकर यांनी शासनदरबारी पाठपुरावा केल्याने 18 हजार स्क्वेअर फुटातील जागेत तीन मजल्याची इमारत मंजूर झाली. 2016 मध्ये या इमारतीचे भूमिपूजन झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीच्या कामाला अंतिम टप्प्यात आणले आहे.आज दुपारी डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी या इमारतीची पाहणी केली. इमारत अंतिम टप्प्यात असून विद्युत प्रवाह जोडणी शिल्लक आहे. याशिवाय समोरची जुनी भिंत तोडून त्याजागी नव्या भिंतीचे बांधकाम सुरू केले जाणार आहे. हे काम येत्या काही दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना किणीकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष्मीकांत गालफाडे, संजय कोरडे, माजी नगरसेवक घनश्याम कणसे, शाखा प्रमुख बाळकृष्ण पाटील, राजू वालंज, भार्गव जाधव, विलास काकडे, यशवंत नेतकर आदी उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government offices in Ulhasnagar in the final phase of a building under one roof