राज्यभरातील सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टर बेमुदत संपावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

विद्यावेतन व इतर मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी व महापालिका रुग्णालयांतील सुमारे ४५०० निवासी डॉक्‍टरांनी बुधवारपासून (ता. ७) बेमुदत संप पुकारला आहे

मुंबई : विद्यावेतन व इतर मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी व महापालिका रुग्णालयांतील सुमारे ४५०० निवासी डॉक्‍टरांनी बुधवारपासून (ता. ७) बेमुदत संप पुकारला आहे. या दिवशी निवासी डॉक्‍टर अत्यावश्‍यक सेवेतही सहभागी होणार नसल्याची माहिती सेंट्रल मार्ड या संघटनेने दिली. त्यामुळे बुधवारी रुग्णसेवा कोलमडण्याची शक्‍यता आहे.

राज्यभरात सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांना अद्याप विद्यावेतन वेळेवर मिळत नाही. निधीअभावी विद्यावतेन रखडल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयांनी दिल्याची माहिती सेंट्रल मार्डच्या अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे यांनी दिली.

मागील ऑगस्टपासून विद्यावेतनातील वाढ रखडली आहे. सध्या निवासी डॉक्‍टरांना दरमहा ५३ हजार रुपये विद्यावतेन मिळते. त्यात जानेवारीपासून पाच हजार रुपयांची वाढ करण्याचे तोंडी आश्‍वासन हवेतच विरून गेले आहे, अशी टीका त्यांनी केली. 

कित्येक वर्षांपासून निवासी डॉक्‍टरांच्या क्षयरोग व प्रसूती रजेचा प्रश्‍न प्रलंबित आहे. त्यामुळे दोन दिवसांत तोडगा न निघाल्यास बेमुदत संप अटळ आहे असे त्या म्हणाल्या.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government resident doctors strike from wensday