कंगना प्रकरणात राज्यपालांची एन्ट्री, अजोय मेहतांकडे व्यक्त केली नाराजी

पूजा विचारे
Thursday, 10 September 2020

कंगना प्रकरणात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एन्ट्री घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता यांच्याकडे राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

मुंबईः बुधवारी अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला.  त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चिघळलं आहे. कंगना प्रकरणात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एन्ट्री घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता यांच्याकडे राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी कंगना प्रकरणाची अयोग्य पद्धतीनं हाताळणी केली असल्याची म्हणत राज्यपालांनी मेहता यांच्याकडे आपली नाराजी बोलून दाखवली.  मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई ही घाईघाईनं घेतली असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. राज्यपालांनी अजोय मेहता यांना तातडीनं राजभवनात बोलावून ही नाराजी व्यक्त केलीय. 

महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्य नव्हती. कंगनानं राज्य सरकारविरोधात वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्याविरोधात कारवाई करण्यात आली, असं राज्यपालांनी म्हटलं आहे. 

कंगनांचे आजचे ट्विट

श्री बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारसरणीवर शिवसेना निर्माण केली, आज तीच विचारधारा सत्तेसाठी विकली आणि शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली. ज्या गुंडांनी माझे घर माझ्या मागे फोडले, त्यांना नागरी संस्था म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका, असे ट्वीट कंगनाने केलं आहे.

कंगनानं सकाळी आणखी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तिनं एक फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये तिने इशा योगा सेंटरमधील तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच हा आपला सर्वाधिक आवडता फोटो असल्याचं म्हटलं आहे.

कंगना या ट्विटमध्ये म्हणाली की, हा माझा सर्वात आवडता फोटो आहे. हा माझ्या इशा योग सेंटरमध्ये काढण्यात आला. त्यावेळी काहीही ठरलेलं नव्हतं, सहजपणे हा फोटो काढला होता. मात्र, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी सुंदरपणे स्मित हास्यासह दिसत आहे.

Governor bhagatsingh koshyari angry on cm uddhav thackeray bmc kangana action


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor bhagatsingh koshyari angry on cm uddhav thackeray bmc kangana action