गृहसंकुलांत महिलांच्या हक्कांची पायमल्ली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

मुंबई - गृहसंकुलांमध्ये महिला सदस्यांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याचे वुमेन्स लीगल फोरम फॉर हाउसिंग सोसायटीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. गृहसंकुलांमध्ये होणारे महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी गृहसंकुलात असोसिएट मेंबर व्हावे, असे आवाहन गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले.

कायद्याने गृहसंकुलातील महिला सदस्यांना अनेक अधिकार दिले आहेत. मात्र सरसकट या हक्कांची पायमल्ली होते. घरातील महिलेच्या किंवा मुलींच्या नावे घर न करणे, गृहसंकुलातील घर पती-पत्नी दोघांच्याही नावे असेल, तर शेअर सर्टिफिकेटवर पत्नीचे नाव न टाकणे, गृहसंकुलाच्या व्यवस्थापन समितीमध्ये महिला सदस्यांचा समावेश न करणे, सोसायटीच्या कार्यालयात महिलांना समानतेची वागणूक न देणे, अशा अनेक प्रकारे महिलांच्या हक्काची पायमल्ली होत असल्याचे फोरमकडे आलेल्या तक्रारींमधून उजेडात आल्याचे फोरमच्या अध्यक्ष सुनीता गोडबोले यांनी सांगितले.

शंभरहून अधिक सदस्य संख्या असलेल्या गृहसंकुलाच्या व्यवस्थापन समितीत किमान दोन महिला सदस्यांचा सहभाग असणे कायद्याने बंधनकारक आहे. असे असतानाही अनेक सोसायट्यांमध्ये महिलांसाठी राखीव जागांवर पुरुषांनाच घेण्यात येत असल्याचे गोडबोले यांनी सांगितले. या अन्यायाविरोधात महिलांनी पुढे यावे, असे आवाहन फोरमच्या सदस्या डॉ. नलिनी हसगेकर यांनी केले.

"व्हिडिओ शूटिंग'ला फाटा
शंभर किंवा त्याहून अधिक सदस्य संख्या असलेल्या गृहसंकुलांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा यांचे व्हिडिओ शूटिंग करणे आवश्‍यक असल्याचे परिपत्रक सहकार आयुक्तांनी जारी केले आहे; मात्र कोठेही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
- सुनीता गोडबोले

Web Title: grahsankul women