Grampanchayat Election Result | ठाणे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व; बालेकिल्ल्यातही शिवसेनेला धक्का

Grampanchayat Election Result | ठाणे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व; बालेकिल्ल्यातही शिवसेनेला धक्का

ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये ठाणे जिल्ह्यात भाजपने शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला धक्का देत अनेक ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायातींसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजपचे खासदार कपील पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार किसन कथोरे या दोघांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अनेक ग्रामपंचायती काबीज केल्या आहेत. असे असले तरी, अद्यापही सरपंच पदासाठी आरक्षण जाहिर न झाल्याने प्रत्यक्ष आरक्षणानंतर सरपंच पदाची गणिते ठरविण्यात येणार आहे. 

एप्रिल ते डिसेंबर कालावधीत 158 ग्रामपंचायतींच्या कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानुसार जानेवारी महिन्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. निवडणुकीत दोन हजार 231 उमेदवार उभे होते. शुक्रवारी 469 केंद्रावर 80 टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आणि त्यामध्ये भाजपची सरशी झाली. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा नेतृत्व जिल्हाबाहेरच होते. त्याचाच फटका शिवसेनेला बसल्याचे बोलले जात आहे. तर, भाजपचे खासदार कपील पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार किसन कथोरे या तिघांनी एकत्रित व नियोजनबद्ध निवडणुक लढविल्याने त्याचा फायदा भाजपला झाल्याचेही बोलले जात आहे. या निवडणुकीत राष्टवादी आणि मनसेला काही ठिकाणी जागा मिळाल्या असल्या तरी त्या तुलनेत जिल्ह्यात कॉंग्रेसची पिछेहाट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 

भिवंडीत 56 पैकी 36 जागा भाजपकडे 
भिवंडी तालुक्‍यातील 56 पैकी 30 ग्रामपंचायतींवर भाजपने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर मात केली आहे; तर आणखी चार ठिकाणी भाजपला युतीच्या माध्यमातून सत्ता मिळणार आहे. त्यामुळे तालुक्‍यातील एकूण 34 ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. 
भिवंडीतील अनेक ग्रामपंचायत भागात शिवसेनेचे वर्चस्व संपुष्टात आले असून प्रतिष्ठेच्या काल्हेर, शेलार, पूर्णा ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. भिवंडी तालुक्‍यातील एकूण 56 ग्रामपंचायतींपैकी वळ, आलिमघर, निवळी आणि चिंचवली-खांडपे ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यात भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सहमती झाली होती. उर्वरित 53 ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीच्या मानल्या जात होत्या. भाजपविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस एकत्र आले होते; मात्र खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ग्रामपंचायतींवर निर्विवाद बहुमत मिळवले आहे. तालुक्‍यातील श्रीमंत ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या काल्हेर ग्रामपंचायत अंतर्गत निवडणुकांच्या काळात झालेली गोळीबाराची घडलेली घटना, त्यामुळे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या काल्हेर ग्रामपंचायतीवर भाजपने एक हाती सत्ता काबीज केली. खासदार पाटील यांचे गाव दिवे अंजूरमध्येही भाजपचा झेंडा फडकला. पूर्णा, माणकोली, पिंपळास, झिडके, कुकसे, ओवळी, लामज, लाखिवली, वडघर, डुंगे, जुनांदुर्खी, अंजूर, पिंपळनेर आदी ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत; तर खारगाव व निंबवली ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून भिवंडी तालुक्‍याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता; मात्र गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारकडून भिवंडीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र असूनही भाजपला मतदारांनी पसंती दिली. 
- कपिल पाटील,
खासदार, भिवंडी 

....................................................... 

कल्याणमध्येही भाजपचे वर्चस्व 
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडाला. मलंगवाडी परिसरातील नऊ ग्रामपंचायतीमधील 85 जागांपैकी सर्वाधिक 43 जागा भाजप, राष्ट्रवादीने 30 तर, सात जागा शिवसेना, पाच जागा मनसेने जिंकल्या आहेत. मनसेने पाच जागा जिंकून ग्रामीण भागातील आपले अस्तित्व राखले. राष्ट्रवादीने 30 जागा जिंकून पडद्यामागून शिवसेनेला धोबीपछाड दिला असल्याची चर्चा रंगली आहे. 

शहापूर तालुक्‍यात सेनेचा वरचष्मा 
शहापूर तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला धोबी पछाड देत पाच पैकी चार ग्राम पंचायतींवर निर्विवाद वर्चस्व राखले आहेत. शिवसेने डोळखांब, अल्याण, चेरपोली आणि भावसे, ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये डोळखांब मधील 9 पैकी 9 जागा मिळविली, तर, चेरपोलीत 15 पैकी 9 जागा सेनेला मिळाल्याची माहिती आहे. 

अंबरनाथ तालुक्‍यात मनसेने उघडले खाते 
अंबरनाथ (बातमीदार) : अंबरनाथ तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात शिवसेनेने बाजी मारली आहे; तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काकोळे ग्रामपंचायत निवडणुकीत खाते उघडून अनपेक्षित धक्का दिला आहे. 
तालुक्‍यातील 27 ग्रामपंचायतीपैकी 12 ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत. सात जागा भाजपाने जिंकल्या आहेत. या खालोखाल राष्ट्रवादीने चार जागी विजय मिळवला आहे; तर काकोळे ग्रामपंचायतमध्ये सात पैकी मनसे पुरस्कृत चर उमेदवार निवडून आल्याने मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत खाते उघडले आहे. महाविकास आघाडीने तीन ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे; मात्र गेल्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेकडे असलेल्या 18 ग्रामपंचायतीत घट झाली असून ती संख्या 12 वर आली आहे. 
मुरबाडमध्ये भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या मतदार संघातील 16 पैकी 12 ग्रामपंचायती शिवनेनेने पटकावल्या आहेत. तालुक्‍यातील गोरेगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात 11 ग्रामपंचायतींपैकी भाजपा चार, राष्ट्रवादी कॉंग्रेस चार आणि दोन जागी महाविकास आघाडी यशस्वी झाली आहे. नेवाळीमध्ये भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. 

Grampanchayat Election Result BJP victory in Thane district

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com