Grampanchayat Result | पनवेल ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा झेंडा

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 18 January 2021

अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यातील ग्रामपंचायत भाजपच्या शिलेदारांनी काबीज करत या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे.

नवीन पनवेल  : पनवेल तालुक्‍यातील 24 ग्रामपंचायतींपैकी दोन बिनविरोध झाल्याने शुक्रवारी (ता. 15) 22 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका घेण्यात आल्या. त्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. 22 ग्रामपंचायतींमध्ये 11 जागांवर भाजपने आपला झेंडा फडकावला असून, आठ जागांवर शेकाप, तर तीन जागांवर संमिश्र पक्ष विजयी झाले आहेत. 
महिनाभरापासून तालुक्‍यातील ग्रामीण भागात निवडणूक चांगलीच रंगात आली होती. अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यातील ग्रामपंचायत भाजपच्या शिलेदारांनी काबीज करत या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. शेकापसह महाविकास आघाडीला चारी मुंड्या चित केले. पनवेल तालुक्‍यातील दोन ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झाल्याने 22 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. निवडणुकांची मतमोजणी सोमवारी दुपारपर्यंत पूर्ण झाली होती; मात्र दुपारचे 3.30 वाजले तरी निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. या वेळी अरुण भगत यांनी 24 ग्रामपंचायतींमधील 228 जागांपैकी 144 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आल्याचे सांगितले. अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यात असलेल्या पालीदेवद, वाजे, खानाव, ग्रामपंचायतींवर मात्र भाजपने बाजी मारली आहे. 
पंचवार्षिक निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात 15, तर भाजपच्या 9 जागा होत्या. सध्याचे निकाल पाहता पनवेल तालुक्‍यातील ग्रामीण भागात भाजपने मुसंडी मारल्याचे चित्र आहे. 

निकालातही चुरस रंगली 
24 पैकी 14 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकल्याचा दावा तालुकाध्यक्ष अरुण भगत यांनी केला आहे. तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते आर. डी. घरत यांनी 13 ग्रामपंचायतींवर शेकाप, महाविकास आघाडी, ग्रामविकास आघाडी व मित्रपक्षांनी झेंडा फडकवला असल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामपंचायत निकालातही दोन्ही पक्षांत चुरस रंगल्याचे आज निकालाच्या वेळी दिसून आले. जास्त जागांवर दोन्ही पक्षांचा दावा करण्यात आल्यामुळे पनवेल तालुक्‍यातील ग्रामपंचायतीचा निकाल संमिश्र लागल्याची चर्चा रंगली होती. 

 

ग्रामपंचायतीचे एकंदरीत निकाल पाहता मागील पंचवार्षिकच्या तुलनेत यंदा जास्त ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील मतदारांचा कौलही भाजपला मिळाला आहे. या यशात स्थानिक कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. 
- प्रशांत ठाकूर,
भाजप, 
आमदार, पनवेल विधानसभा 

 

यंदाच्या ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये शेकापला घवघवीत यश मिळाले आहे. मागील वर्षी पंचवार्षिकपेक्षा यंदा अपवाद वगळता समाधानकारक जागा मिळवल्या आहेत. 
- बाळाराम पाटील,
आमदार, 
शेतकरी कामगार पक्ष, कोकण शिक्षक मतदारसंघ 

Grampanchayat Result BJPs victory over Panvel in raigad

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grampanchayat Result BJPs victory over Panvel in raigad