बेस्टला कर्जमुक्त करण्यासाठी पालिका देणार 1200 कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला कर्जातून बाहेर काढण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे

मुंबई : बेस्टला 1200 कोटी रुपये देण्यास पालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी मंजुरी दिल्याने बेस्टच्या आर्थिक मदतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला कर्जातून बाहेर काढण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यासाठी पालिका बेस्टला 1200 कोटी रुपये देणार आहे.

बेस्टवर सध्या अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे बेस्टला कोणत्याही बॅंका मोठे कर्ज देत नाहीत. बेस्ट उपक्रम हा मुंबई महापालिकेचा उपक्रम असल्याने पालिकेने पुढाकार घेऊन तिला कर्जातून बाहेर काढण्याची मागणी केली जात होती. तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बेस्टला एक रुपयाही न देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, प्रविणसिंग परदेशी यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच बेस्टला दरमहा 100 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. नुकत्याच झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत बेस्टला कर्जमुक्त करण्यासाठी 1200 कोटी रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली.

मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. आर्थिक अडचणीत असणाऱ्या बेस्टला मदत मिळाल्याने मुंबईकरांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बेस्टचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी सांगितले. बेस्टला मदत देण्याच्या या निर्णयाचं सर्व पक्षीय नगरसेवकांनी स्वागत केले आहे. पालिकेने 1200 कोटी रुपये दिल्यावर बेस्टने आपल्या कारभारात सुधारणा करून तोटा कमी करावा, असे आवाहन रवी राजा यांनी केले आहे.

नव्या बसेस मुंबईत दाखल
बेस्टच्या ताफ्यात नव्याने येणाऱ्या वातानुकुलीत बस मुंबईत दाखल झाल्या आहेत. 6 बसेस बेस्टच्या धारावी आगारात ठेवण्यात आल्या आहेत. सध्या या बसेसची आरटीओ पासिंग झाल्यानंतर त्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grant given to best by bmc