श्रीलंकेतील मराठी वाचकांसाठी उत्तम साहित्य भेट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या "ग्रंथ तुमच्या दारी' योजनेचा शुभारंभ 

मुंबई : कोलंबो (श्रीलंका) येथील मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांना ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यासाठी "कुसुमाग्रज प्रतिष्ठान'ने "ग्रंथ तुमच्या दारी' या वाचकप्रिय योजनेचा शुभारंभ केला आहे. त्यामुळे कोलंबोसह श्रीलंकेतील वाचकांना मराठीचे उत्तमोत्तम साहित्य वाचता येणार आहे. 

कोलंबो येथे वास्तव्यास असलेले आणि मूळचे नाशिकचे रहिवासी श्रीनिवास पत्की हे "ग्रंथ तुमच्या दारी' योजनेचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या पुढाकाराने या योजनेचा शुभारंभ झाला. "ग्रंथ तुमच्या दारी' योजनेचे प्रणेते विनायक रानडे आणि विश्‍वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख विश्‍वास ठाकूर यांच्या हस्ते ग्रंथपेटीचे वितरण करण्यात आले.

एका ग्रंथपेटीत 25 पुस्तके आहेत, प्रत्येक पेटीतील पुस्तके वेगळी असतात, विविध भागांत या पेट्या वाचकांच्या गटाला तीन महिन्यांसाठी उपलब्ध असतात, दर किमान 3 महिन्यांनी पेट्या परस्परांमध्ये बदलत ठेवल्यामुळे सर्वांना वेगवेगळी पुस्तके उपलब्ध होतात. भविष्यात जशा ग्रंथ पेट्या वाढत जातील तेवढी विविध प्रकारची जास्तीत जास्त पुस्तके वाचकांना उपलब्ध होतील, असे विनायक रानडे म्हणाले. 

या योजनेतील सहभागी वाचक, समन्वयक, संस्था, देणगीदार, हितचिंतक यांच्या सक्रिय सहभागानेच हा विस्तार वाढत आहे, असेही रानडे यांनी सांगितले. 

"ग्रंथ तुमच्या दारी'ची विक्रमी घोडदौड 
2 कोटी 25 लाख रुपयांची ग्रंथ संपदा. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, सिल्व्हास, तामिळनाडू, कर्नाटक तसेच भारताबाहेर दुबई, नेदरलॅंड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, फिनलॅंड, वॉशिंग्टन डीसी, मॉरिशस, ओमान, मस्कत, सॅनफ्रान्सिस्को, बे एरिया, सिंगापूर, लंडन, आता श्रीलंका येथेही ग्रंथसंपदा पोहोचली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A great gift for Marathi readers in Sri Lanka