सिडकोच्या ऑनलाईन सुविधेला उत्तम प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

सिडकोने ऑनलाईन पद्धतीने सुरू केलेल्या विविध दाखले वाटप सुविधांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या ऑनलाईन कार्यप्रणालीत आठवडाभरात एक हजारपेक्षा जास्त ग्राहकांनी ऑनलाईन दाखल्यांसाठी अर्ज भरले आहेत.

नवी मुंबई : सिडकोने ऑनलाईन पद्धतीने सुरू केलेल्या विविध दाखले वाटप सुविधांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या ऑनलाईन कार्यप्रणालीत आठवडाभरात एक हजारपेक्षा जास्त ग्राहकांनी ऑनलाईन दाखल्यांसाठी अर्ज भरले आहेत. दिवसाला शंभरपेक्षा जास्त अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले जात आहेत. सिडकोने सुरू केलेल्या स्वतःच्या केंद्रांपेक्षा जास्त अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले जात आहेत. 

नागरिकांना घरबसल्या सिडकोच्या सर्व सुविधांचा लाभ घेता यावा याकरीता १ नोव्हेंबरपासून सिडकोने ऑनलाईन सुविधांना सुरुवात केली. सिडकोचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांच्या हस्ते खारघर नोडल कार्यालयातून या सुविधांचा प्रारंभ झाला. सिडकोने ऑनलाईन सुविधा सुरू केल्यामुळे अर्जासोबत जोडली जाणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पत्रप्रपंच कमी झाल्यामुळे अर्ज भरण्यास मदत होत आहे. पूर्वी एका कागदासाठी अर्ज रखडून पडत होता. मात्र, आता ती संख्या घटली आहे. ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणा करण्याच्या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्जदारांना स्कॅन कागदपत्रे सादर करण्याची मुभा देणे, डिजिटल स्वाक्षऱ्या असणारी कागदपत्रे/ ना हरकत दाखले ऑनलाईनसाठी पाठवणे आदी महत्त्वाचे निर्णय ऑनलाईन सुविधा कार्यान्वित झाल्यामुळे सुलभ झाले आहेत. ऑनलाईन पद्धतीने आता वसाहत विभागाच्या सर्व सेवाही सुरू झाल्या आहेत. ऑनलाईन सेवा सुरू झाल्यानंतर यापुढे आवश्‍यक कागदपत्रे स्कॅन केलेल्या प्रतींसह फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे आवाहन सिडकोतर्फे केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great response to Cidco's online facility