बांधावर हिरवळ बहरणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

शेताच्या बांधावर विविध प्रकारची वृक्षलागवड करून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न रायगडमधील शेतकरी पारंपरिक पद्धतीने करत आले आहेत. यामध्ये विशेष संशोधन करण्यात न आल्याने याचा फायदा प्रभावीपणे येथील शेतकऱ्यांना घेता येत नव्हता.

मुंबई : शेताच्या बांधावर विविध प्रकारची वृक्षलागवड करून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न रायगडमधील शेतकरी पारंपरिक पद्धतीने करत आले आहेत. यामध्ये विशेष संशोधन करण्यात न आल्याने याचा फायदा प्रभावीपणे येथील शेतकऱ्यांना घेता येत नव्हता. यासाठी राज्य सरकारने अभ्यास समिती गठित केली आहे. ही समिती बांधावरील वृक्षांच्या संवर्धनासंदर्भात अहवाल सादर करणार आहे.

शेताच्या बांधावर वृक्षलागवड केल्याने मातीची धूप, पडणाऱ्या पालापाचोळ्यापासून सेंद्रिय खत, फळांपासून मिळणारे उत्पन्न, लाकूडफाटा, इमारतीसाठी लाकूड, निवारा असे अनेक फायदे मिळत असतात. कुंपणासाठीही त्याचा उपयोग होत असतो. या पद्धतीचा अवलंब करून जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, रोहा, कर्जत, सुधागड या तालुक्‍यातील शेतकरी भातशेतीबरोबरच फळपिकापासूनही उत्पन्न घेत आहेत.

भातशेतीसाठी खर्च परवडत नसल्याने जमीन नापीक राहीली तरीही बांधावरील वृक्षांपासून मिळणारे उत्पन्न सुरूच असते. त्यामुळे रायगड जिल्ह्यात अशा प्रकारच्या वृक्षलागवडीकडे शेतऱ्यांचा कल वाढतच  आहे. अशा प्रकारच्या वृक्षलागवड आणि संवर्धनाचा प्रयोग गोंदिया जिल्ह्यात करण्यात आला होता. 

तेथील तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी जिल्हा नियोजनमधून अनुदान देण्याची नावीन्यपूर्ण योजना गोंदिया जिल्ह्यात राबवली होती. यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे, यासाठी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे. ही समिती अभ्यास करून अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.

शेताच्या बांधावर साग, आंबा, फणस यांसारख्या वृक्षाच्या लागवडीतून अनेक फायदे मिळत असतात. परंतु यासाठी कोणतेही अनुदान मिळत नव्हते. कोणत्या जमिनीत कोणत्या वृक्षांची लागवड झाल्यास जास्त फायदा मिळेल या संदर्भात माहिती मिळत नव्हती. यासाठी मिळणाऱ्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.
- गजानन पाटील, शेतकरी, मुरूड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: greenery on dam near mumbai