भाडेकरूंच्या तक्रार निवारणासाठी म्हाडा-पालिकेचा मेळावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

शहर परिसरातील उपकरप्राप्त आणि अन्य इमारतींमधील भाडेकरूंना नेहमी भेडसावणारे प्रश्‍न व येणाऱ्या अडचणींसंदर्भात म्हाडा आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उत्तरे मिळवण्यासाठी येत्या गुरुवारी (ता. २२) डोंगरीमध्ये महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मुंबई ः  शहर परिसरातील उपकरप्राप्त आणि अन्य इमारतींमधील भाडेकरूंना नेहमी भेडसावणारे प्रश्‍न व येणाऱ्या अडचणींसंदर्भात म्हाडा आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उत्तरे मिळवण्यासाठी येत्या गुरुवारी (ता. २२) डोंगरीमध्ये महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. आपल्या विविध समस्यांबाबत रहिवाशांना मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येईल. 

विकासकांकडून होणारी फसवणूक, म्हाडाच्या धोकादायक इमारतीतील वास्तव्य, घरमालकाचा त्रास, विकासक आणि घरमालकांकडून रहिवाशांना हुसकावण्याचा प्रयत्न, विकासकाने पुनर्बांधणीसाठी इमारत पाडूनही काम बंद, घर असलेली इमारत महापालिकेने अवैध ठरवली, मोडकळीला आलेल्या खासगी व म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत सरकारचे धोरण काय आदी अनेक प्रश्‍न मुंबईकरांना विशेषतः शहर विभागातील रहिवाशांना पडतात. रहिवासी, घरमालक, विकासक, म्हाडा व महापालिका यांच्यातील वादात इमारतीची अवस्था बिकट होते.

काही ठिकाणी जबरदस्तीने चाळ सोडावी लागते किंवा वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात खितपत पडावे लागते, असाही कित्येकांचा अनुभव आहे. अशा काही प्रश्‍नांची कायदेशीर व सुसंगत उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांकडूनच मिळावीत म्हणून शिवसेनेच्या दक्षिण मुंबई विभागाचे प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्यातर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, मंडळाचे मुख्य अधिकारी कैलास लोखंडे, महापालिकेच्या बी व सी विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, म्हाडा व महापालिकेचे अभियंते आणि अन्य वरिष्ठ अधिकारी मेळाव्यात हजर असतील. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत व खासदार अनिल देसाई यांचीही मेळाव्यात विशेष उपस्थिती असेल. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता डोंगरीतील सेंट जोसेफ हॉलमध्ये मेळावा होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री अरविंद सावंत उपस्थित असतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grievance Redressal meeting by mhada, mumbai municipalty for residance