मुंबईतील खेळाची मैदाने उपयुक्त नाहीत

gound
gound

मैदाने म्हणजे शहराचा श्‍वास समजली जातात. भावी पिढी सुदृढ व आरोग्यदायी घडवण्यातील मैदाने हे एक माध्यम आहे. पण वाढत्या शहरीकरणामुळे व विकसकांच्या हव्यासापोटी हा श्‍वासच आता गुदमरत चालला आहे. ही मैदाने क्‍लब संस्कृती, अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहेत. मैदाने वाचवण्यासाठी सरकारी स्तरावर विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. ‘सकाळ’च्या परळ कार्यालयात झालेल्या चर्चासत्रात मान्यवरांनी मुंबईतील मैदाने खेळासाठी योग्य नसल्याचे मत मांडले.

नूतनीकरणाच्या नावाखाली मैदानांचे झालेले काँक्रिटीकरण, विकासाच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार, यामुळे मुंबईतील मैदानांची दुर्दशा झाली आहे, असे मत मैदान बचाव समितीचे भास्कर सावंत यांनी मांडले. मुंबईतील मैदानांची संख्या कागदावर असून, यातील अनेक मैदाने खेळण्यासाठी उपयुक्त नाहीत, अशा शब्दांत त्यांनी मैदानांची दुरवस्था सांगितली. ‘मुंबईतील मैदाने’ या विषयावर ‘सकाळ’च्या परळ कार्यालयात झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. 

नगरसेवक निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून मैदानांचा विकास केला जातो. त्यात मैदानांचे मूळ रूप बदलून मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण करण्यात येते. ज्याने मैदाने फक्त चकाचक दिसतात, मात्र खेळांसाठी फारशी उपयुक्त राहत नाहीत. जॉगिंग ट्रॅकसाठी पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यात येतो. पेव्हर ब्लॉकखाली उंदीर बिळ करतात.

निवडणुकीपूर्वी अनेकदा मैदानांचे सुशोभीकरण करण्यावर भर दिला जातो. अशावेळी मानवी शरीराला उपयुक्त नसलेली झाडे लावली जातात.  मैदानांवर खेळाडूंना कपडे बदलण्यासाठी रूम किंवा स्वच्छतागृहासारख्या सोयी नसल्याचा अनुभव राष्ट्रीय कबड्डीपटू तेजस्विनी पोटे हिने चर्चेदरम्यान सांगितला. विशेषतः महिला खेळाडूंना याचा त्रास सहन करावा लागतो. मैदानात सरावाआधी छोट्या व्यायामशाळेची गरज आहे, असेही तिने सांगितले. अनेकदा मैदानात होणाऱ्या शेरेबाजीसाठी आयोजक तसेच कार्यकर्त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असेही ती म्हणाली. मैदानामध्ये सोयी- सुविधांसाठी राजकीय पक्षांनीही लक्ष घालण्याची गरज तिने व्यक्त केली.

विकासाच्या नावाखाली मैदानांच्या कामात भ्रष्टाचार
भास्‍कर सावंत अध्यक्ष, मैदान बचाव समिती

महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत २६७ मैदाने, १३१ उद्याने आणि ३१९ मनोरंजन मैदाने आहेत. मैदानांच्या विकासाचा किंवा नूतनीकरणाच्या निधीचा वापर अनेक ठिकाणी मैदानात जॉगिंग ट्रॅक बांधण्यासाठी केला जातो. आकारमानात न बसणाऱ्या मैदानातही जॉगिंग ट्रॅक उभारले आहेत. झाडे, फुले आणि मातीऐवजी मैदाने ग्रॅनाईटने सजवलेली आहेत. निवडणुका आल्या की कामे सुरू होतात. मैदानाचा वापर हा खेळासाठीच होतो का, हादेखील प्रश्‍न आहे.

भ्रष्टाचारासाठीही मैदाने
महापालिकेमार्फत एकाच ट्रकमधून मैदानात दुतर्फा माती टाकली जाते आणि कागदोपत्री दोन ट्रकमधून माती टाकल्याचे दाखवले जाते. अनेकदा माती टाकण्याच्या निमित्ताने डेब्रिज टाकण्यात येते. वडाळ्यातील कुष्ठरोग रुग्णालयातही मातीच्या नावाखाली डेब्रिज टाकल्याची तक्रार आली होती. महापालिकेकडून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत डेब्रिज टाकणाऱ्याने बरेचसे पैसे कमावलेले असतात. मातीतला पैसा असा कुठेही काढला जातो. त्यामुळे मैदानाच्या निमित्ताने होणारा भ्रष्टाचार हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे.

मैदानांवर डल्ला
महापालिकेने भाडे तत्त्वावर किंवा दत्तक योजनेंतर्गत दिलेल्या मैदानांवर खरोखरच मुले खेळतात का? भाड्याने दिलेल्या मैदानावर सध्या क्‍लब संस्कृती रुजत आहे. दत्तक योजनेंतर्गत खेळाशी संबंधित मैदाने आहेत, त्यांना ही मैदाने देण्यात आली आहेत का? तर त्याला माझं उत्तर नाही असं आहे. मुंबईत मैदानांची दुरवस्था झाली आहे. खेळाडू घडवणाऱ्या संस्थांसाठी निधी पोहोचत नाही ही वास्तविकता आहे.

निवडणुका आणि मैदान
मैदानाला खेळाडूंचे नाव देऊन उपयोग नाही. मुंबईतल्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर क्रीडा धोरण नाही हे वास्तव आहे. राजकीय पक्षांतर्फे खेळाडूंनाही उमेदवारी मिळायला हवी, पण तसे घडत नाही. खेळाडूला राजकारणात मोठे होऊ दिले जात नाही. एकेकाळी नगरसेवक हे अनेक क्रीडा संस्थांचे पदाधिकारी होते, पण आता कोणताच नगरसेवक क्रीडा क्षेत्राचा विचार करत नाही. निवडणुकीपूर्वी क्रीडा संस्थांना निधी द्यायचा आणि स्पर्धा भरवायच्या ही हमखास पद्धत झाली आहे.

क्‍लब संस्कृती घातक
क्‍लब संस्कृती ही दिसायला भव्य दिसते. थ्री स्टार, फाईव्ह स्टारची सुविधा एखाद्या क्‍लबला मिळते. अशा क्‍लबची मेंबरशीप ही लाखांच्या घरात असते. स्थानिकांना त्याचा उपभोग घेता येत नाही. स्वीमिंग पूल बांधले जातात ते सर्वसामान्यांना परवडत नाहीत. मुंबईत अनेक स्वीमिंग पूल आहेत. जलतरण तलाव महाराष्ट्रात एकूण २७५ आणि मुंबईत १६५ आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com