गटबाजीचे आव्हान

तेजस वाघमारे
गुरुवार, 19 जानेवारी 2017

राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ‘एकला चलो’चा नारा देत मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली आहे. शिवसेना-भाजपमध्ये युतीवरून घमासान सुरू असल्याने त्यांना चीत करण्यासाठी काँग्रेसने सर्व शक्ती पणाला लावली आहे; पण नेत्यांमधील गटबाजीचे आव्हान पक्षासमोर आहे...

लोकसभा मतदारसंघांवर एकेकाळी दबदबा असलेल्या काँग्रेसमधील नेत्यांना नरेंद्र मोदी लाटेत चांगलाच धोबीपछाड मिळाला. या धक्‍क्‍यातून सावरत काँग्रेस विधानसभा निवडणुकीला सामोरी गेली; पण तिथेही त्यांना मोठे अपयश आले. लोकसभा निवडणुकीत सहापैकी एकही जागा काँग्रेसला राखता आली नाही. विधानसभा निवडणुकीत ३६ पैकी केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ५१ नगरसेवक विजयी झाले; परंतु पाच वर्षांत काँग्रेसमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अडचणीत आल्यानंतर मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांच्या जागी विद्यमान अध्यक्ष संजय निरुपम यांची वर्णी लागली; पण त्यांच्या निवडीने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या नाराजीतून काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे राजीनामानाट्य रंगले. नेत्यांत नाराजी अद्याप कायम असल्याने पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागले आहे.

समर्थकांच्या  उमेदवारीसाठी गटबाजी
पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने विविध प्रश्‍नांवर सरकारविरोधात आंदोलन, धरणे आदी कार्यक्रम सुरू ठेवून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कोकणवासीय आणि उत्तर भारतीय मतदारांना आपलेसे करण्यासाठी मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पक्षातील संजय निरुपम, गुरुदास कामत, मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी, प्रिया दत्त आणि एकनाथ गायकवाड यांचे वेगवेगळे गट आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी म्हणून गटबाजी सुरू झाली असून त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

जसा मतदार तशी रणनीती
सर्व जाती-धर्मातील मतदारांना आपलेसे करण्यासाठी काँग्रेसने रणनीती ठरवली आहे. मुस्लिम, दलित, उत्तर भारतीय, मराठी आदी भाषिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी काँग्रेसने संबंधित नेत्यांची फळी उभी केली आहे. गुजराती, जैन, मारवाडी आदी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मिलिंद देवरा यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेनेकडे जाणारी कोकणवासीयांची मते वळवण्यासाठी काँग्रेस नेते नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी विडा उचलला आहे. त्यांच्यामार्फत विविध ठिकाणी कोकणवासीयांचे मेळावे घेण्यात येत आहेत. मात्र, विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ नेते मुंबई काँग्रेस अध्यक्षांच्या विरोधात उभे ठाकल्याने काँग्रेससमोरच आव्हान निर्माण झाले आहे. या राजकारणाचा मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो.

मुंबईत सुरू असलेल्या पक्षाच्या कारभाराबाबत ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्याकडे तक्रारी केल्यानंतरही बदल घडत नसल्याने पक्षात मोठी नाराजी आहे. निरुपम हे शिवसेना-भाजपच्या फायद्याचे निर्णय घेत असल्याने काँग्रेसमधील नेते अस्वस्थ असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

काँग्रेसचे आमदार
वर्षा गायकवाड (धारावी), कालिदास कोळंबकर (वडाळा), अमिन पटेल (मुंबादेवी), अस्लम शेख (मालाड पश्‍चिम) आणि नसीम खान (चांदिवली). 

गेल्या निवडणुकीतील कामगिरी
     मुंबईत काँग्रेसचा एकही खासदार नाही 
     ३६ पैकी केवळ पाच आमदारांना आमदारकी वाचवता आली
     महापालिकेत ५१ नगरसेवक होते
     २२७ जागांवर स्वबळावर काँग्रेस लढली होती

Web Title: Group challenge Congress & NCP