स्थायी समितीवरून शिवसेनेत धुसफूस 

स्थायी समितीवरून शिवसेनेत धुसफूस 

नवी मुंबई - राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक म्हणून लौकिक असलेल्या महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याला मिळाव्यात, याकरिता शिवसेनेत चढाओढ सुरू होती; मात्र आयत्या वेळेस नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी पक्षातील प्रमुख नेत्यांनी गटबाजी केल्यामुळे ज्येष्ठ नगरसेवकांची नाराजी उफाळून आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक विलास भोईर यांनी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने दिवसभर नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती; परंतु आपण राजीनामा दिला नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण केल्यावर चर्चेवर पडदा पडला. 

स्थायी समितीवरील 8 सदस्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागांपैकी शिवसेनेच्या वाट्याला पाच जागा आल्या होत्या. महापालिकेचे हे अखेरचे वर्ष असल्यामुळे पाच जागांसाठी शिवसेनेत तब्बल 16 जण इच्छुक होते. त्यामुळे ही चुरस खूपच वाढली होती. पाच जागांपैकी काही जागांवर नवे चेहरे, झोपडपट्टीबहुल भागातील नगरसेवकांना न्याय आणि स्थानिक; तसेच ज्येष्ठतेप्रमाणे सदस्य निवडण्याचे मोठे आव्हान पक्षातील प्रमुख नेत्यांसमोर होते. मात्र सदस्य निवडताना दोन नवीन चेहऱ्यांना शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी वशिलेबाजी केल्यामुळे चार वेळा नगरसेविका असलेल्या महिला नगरसेविकेला स्थायी समिती सदस्यापासून दूर राहावे लागले आहे. त्यामुळे या नगरसेविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. 

स्थानिक चेहरा म्हणून विलास भोईर यांना स्थायी समितीवर घेतले जाईल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र ऐनवेळेस दुसऱ्या नगरसेवकाच्या नावाची वर्णी लागल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यातूनच त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त पसरले होते. परंतु शिवसेनेत कोणी नगरसेवक नाराज नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे गटनेते व पक्षप्रतोद द्वारकानाथ भोईर यांनी दिले. स्थायी समितीवरील निवडक जागा पक्षाच्या वाट्याला आल्याने समतोल राखण्याच्या हिशेबाने पक्षाने संधी दिली आहे. त्यामुळे कोणी खूश; तर कोणी नाराज होईल हे नैसर्गिक असते, असे भोईर यांनी सांगितले. 

"मातोश्री'वरून फोन 
एका नव्या नगरसेवकाची स्थायी समितीवर वर्णी लागावी, याकरिता नवी मुंबईतील नेत्यांना थेट "मातोश्री'वरून फोन आल्यामुळे एका ज्येष्ठ नगरसेवकाचा बळी द्यावा लागला. स्थानिक चेहरा म्हणून विलास भोईर यांना स्थायी समितीवर घेतले जाईल, अशी शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र ऐनवेळेस दुसऱ्या नगरसेवकाच्या नावाची वर्णी लागल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती. याच नाराजीतून त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे वृत्त पसरले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com