विकासाचा वेग मंदावण्याचे भाकीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

मुंबई- चलन बदलाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून बाजारात रोकड टंचाई निर्माण झाली आहे. दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला असून, उद्योगधंद्यांनादेखील त्याची झळ बसली आहे. काळा पैसा रोखण्याचे हे उपाय दीर्घकालावधीसाठी फायदेशीर ठरणार असून, नजीकच्या काळात मात्र विकासाचा वेग मंदावण्याचे भाकीत पतमानांकन संस्थांनी केले आहे.

मुंबई- चलन बदलाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून बाजारात रोकड टंचाई निर्माण झाली आहे. दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला असून, उद्योगधंद्यांनादेखील त्याची झळ बसली आहे. काळा पैसा रोखण्याचे हे उपाय दीर्घकालावधीसाठी फायदेशीर ठरणार असून, नजीकच्या काळात मात्र विकासाचा वेग मंदावण्याचे भाकीत पतमानांकन संस्थांनी केले आहे.

देशभरात 9 नोव्हेंबरपासून जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. जुन्या नोटा बदली करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असून खात्यातून पैसे काढण्यावरही बंधने असल्याने बाजारात रोकडची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारांतील दैनंदिन उलाढालीला फटका बसला आहे. जुन्या चलनी नोटा रद्द करण्याबरोबर डिजिटल अर्थव्यवहारांना प्रोत्साहन देण्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा आणि तोटा होईल. सध्या बाजारात चलनपुरवठा मर्यादित आहे. त्यामुळे नजीकच्या काळात विकासदर 0.70 ते एक टक्‍क्‍याने घटेल, असा अंदाज "एचएसबीसी' या जागतिक स्तरावरील आघाडीच्या वित्तसंस्थेने व्यक्त केला आहे. मात्र, आर्थिक सुधारणांचा धडाका कायम ठेवला तर दीर्घकालावधीत विकासाचा वेग वाढेल, असेही संस्थेने म्हटले आहे. या मोहिमेत बॅंकांना घसघशीत रोकड उपलब्ध झाली आहे. येत्या काही दिवसांत ठेवी आणि कर्जाचा दर आणि सरकारी रोख्यांचा दर कमी होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

ऍम्बीट कॅपिटल या वित्तसेवा देणाऱ्या संस्थेनेही चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत विकासदर अर्धा टक्‍क्‍याने घसरून 6.4 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. एकूण अर्थव्यवस्थेच्या जवळपास 40 टक्के व्यवहार हे असंघटित व्यवस्थेशी संलग्न आहेत. नोटाबंदीचा फटका या उद्योगांना बसल्याचे ऍम्बीट कॅपिटलने म्हटले आहे. केअर रेटिंगनेही विकासदर 0.30 ते 0.50 या दरम्यान खाली येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. बॅंक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने चलनी नोटा रद्द करण्याच्या निर्णयाने अर्थव्यवस्था अस्थिर बनली असून, याची किंमत विकासदराच्या रूपाने मोजावी लागेल, असे म्हटले आहे. आगामी दोन तिमाहींमध्ये विकासदर अर्धा टक्‍क्‍याने घटेल, असे म्हटले आहे. त्याचबरोबर "आयसीआरए" या संस्थेने विकासदराचा अंदाज 0.40 टक्‍क्‍याने घटवला आहे.

Web Title: growth rate might decline