खाडी किनारी मासेमारी धोक्‍यात!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

नवी मुंबईतील महापे, पावणे, रबाळे याशिवाय तळोजा येथील नाले खाडीकिनारी मिळत असून, यातून औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रित पाणी व मलनिस्सारण वाहून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारी मासेमारी धोक्‍यात आली आहे. 

नवी मुंबई : नवी मुंबई परिसरातील खाडी किनारा रासायनिक युक्त गाळात रुतला आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारी मासेमारी धोक्‍यात आली असल्याचे मच्छीमार संघटनेकडून सांगण्यात आले. महापे, पावणे, रबाळे याशिवाय तळोजा येथील नाले खाडीकिनारी मिळत असून, यातून औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रित पाणी व मलनिस्सारण वाहून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारी मासेमारी धोक्‍यात आली आहे. 

बेलापूर येथील दिवाळे गाव ते ठाणे खाडीपर्यंत पाच ते सहा हजार मच्छीमार खाडीकिनारी मासेमारी करून आपली उपजीविका करतात. मात्र, या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करता नाल्यात सोडले जाते. हे नाले खाडी किनाऱ्याला जोडले गेले आहेत. त्यामुळे बहुतेक वेळा मृत मासे जाळ्यात सापडत आहेत. कोपरी नाल्यात तर रासायनिक सांडपाणी सोडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. तसेच तळोजा औद्योगिक वसाहतीमधील रासायनिकयुक्त पाणी हे थेट दिवाळे खाडीला सोडले जाते. याशिवाय मलनिस्सारण केंद्रातील बहुतांशी सांडपाणीही प्रक्रिया न करताच सोडले जात असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे. त्यामुळे खाडीत गाळाचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी 90 टक्के मासेमारीत घट झाली आहे. रासायनिक गाळामुळे खाडीत टाकलेले जाळेही गाळात रुतले जाऊन खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. दिवाळे मासळी मार्केट हे नवी मुंबईमधील सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षंपासून या ठिकाणी विमानतळ भरावामुळे मासेमारी धोक्‍यात आली असताना त्यात तळोजा येथील कारखान्यातील रसायनमिश्रित पाण्याने मासेमारी अधिकच धोक्‍यात आली आहे. रासायनिक गाळामुळे मासळीच्या जातीही नष्ट होण्याच्या मार्गावर असून, त्यातील बऱ्याच जाती नाहीशा झाल्या आहेत. मासेमारी करणाऱ्या बांधवांना खाडीतील चिखलात उतरून मासेमारी करावी लागते. मात्र, रासायनिक गाळामुळे त्यांना अनेकदा शारीरिक इजा पोहचल्या जातात. पूर्वीसारखी मासेमारी राहिली नसल्याने मासेमारीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. 

नवी मुंबईत दिवाळे गाव ते ऐरोलीपर्यंत हजारो मच्छीमार मासेमारी करीत आहेत. मात्र, या रासायनिक पाणी व सांडपाण्यामुळे गाळ साचत आहे. परिणामी, मासेमारी धोक्‍यात आली आहे. हे प्रकार गेले काही वर्ष सुरूच आहे. मच्छीमारांच्या विविध समस्यांबाबत लवकरच न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. 
- भूषण कोळी, अध्यक्ष, दिवाळे गाव मच्छीमार संघटना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gulf shore fishiry is in threat!