न्यायालय आवारातच दोन गुंडांमध्ये जुंपली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

कुख्यात गुंड छोटा राजनचा विश्‍वासू डी. के. राव आणि त्याचा साथीदार अनिल पाटील यांच्यात मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारातच सोमवारी (ता. 8) हाणामारी झाली. त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यासाठी आणण्यात आले असताना हा प्रकार घडला.

मुंबई - कुख्यात गुंड छोटा राजनचा विश्‍वासू डी. के. राव आणि त्याचा साथीदार अनिल पाटील यांच्यात मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारातच सोमवारी (ता. 8) हाणामारी झाली. त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यासाठी आणण्यात आले असताना हा प्रकार घडला.

अनिल पाटीलने याप्रकरणी कुलाबा पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी अदलखपात्र गुन्हा दाखल केला आहे. राजनचा विश्‍वासू असलेल्या राव याच्यावर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे 30 गंभीर गुन्हे दाखल आहेत. राव आणि पाटील यांना आर्थर रोड तुरुंगातून पोलिस बंदोबस्तात न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते.

सुनावणीला काही वेळ बाकी असल्याने हे दोघे न्यायालयाबाहेर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील पायऱ्यांजवळ थांबले होते. त्याच वेळी राव याने पाटील याला, एका बांधकाम व्यावसायिकाला संदेश पाठवण्यास सांगितले. त्यावरून झालेल्या वादातून दोघांत चांगलीच जुंपली. रावने पाटीलच्या डोक्‍यात मारल्यानंतर दोघांमध्ये मारहाण सुरू झाली. या वेळी जवळच थांबलेले पाटीलचे काही साथीदार त्याच्या मदतीला धावले. त्यामुळे राव याने घाबरून तिथून पळ काढत थेट मोक्का न्यायालय गाठले. तिथे त्याने न्यायाधीशांकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यावर न्यायालयाने पोलिसांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Web Title: Gund Fighting in Court Area Crime